मुंबई: श्रद्धा वालकर (Shradhdha Walkar Murder Case) हत्या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने (Aftab Poonawala) पोलिसांकडे आपल्याला गांजाचं व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. (Delhi Murder Case) तसंच १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली तेव्हा आपण गांजाच्या प्रभावाखाली होतो असं त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. आफताबने दिलेल्या या माहितीमुळे आता या तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
चौकशीदरम्यान आफताब पोलिसांना म्हणाला की, श्रद्धा नेहमी त्याला गांजाच्या व्यसनावरुन ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्चावरून आणि मुंबईतून दिल्लीत सामान घेऊन कोण येणार यावरुन दिवसभर भांडण झालं. या भांडणानंतर आफताब घराबाहेर जाऊन गांजाचं सेवन करुन परत आला श्रद्धाची हत्या करणार नव्हतो, पण गांजाचं सेवन केलं असल्याने त्याच्या प्रभावाखाली आपल्या हातून गुन्हा घडला असा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे.
[read_also content=”मोठी बातमी! राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी https://www.navarashtra.com/india/big-news-threat-to-blow-up-rahul-gandhi-with-a-bomb-nrps-345924.html”]
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी श्रद्धाची रात्री ९ ते १० दरम्यान गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर आफताब रात्रभर मृतदेहाशेजारी बसून गांजाने भरलेली सिगारेट ओढत होता. आफताबने बाथरुमच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. रक्त वाहून जावं यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करताना नळ सुरु ठेवला होता. पाण्याचं बिल जास्त असल्याने पोलिसांना संशय आला होता. हेच बिल या हत्या प्रकरणामध्ये महत्वाचा पुरावा आहे. याशिवाय फॉरेन्सिकला किचनमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत.
हत्या केल्यानंतर आफताबने ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी करुन श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन त्यात ठेवले. नंतर रोज रात्री घराबाहेर पडत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकून देत विल्हेवाट लावली. याशिवाय मेहरुलीच्या नाल्यात काही हाडं सापडली आहेत. आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणं सांगितल्यानंतर ही हाडं सापडली आहेत. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.
दिल्ली कोर्टाने आफताबला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची नार्को-चाचणी करण्यासही परवानगीही दिली आहे. पोलीस आफताबला घेऊन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडलाही जाणार आहे. आफताब आणि श्रद्धा फिरण्यासाठी गेलेल्या ठिकाणांची पोलीस पाहणी करणार आहेत. चौकशीदरम्यान, आफताबने आपण देहरादूनमध्येही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याचं सांगितलं होतं.