आसाममध्ये असदुद्दीन ओवैसी यांची भाजप व काँग्रेसवर टीका केली (फोटो - एक्स)
Assam Election 2026 : आसाम : आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आसामच्या राजकीय मैदानामध्ये उडी घेतली आहे. चहाच्या मळामध्ये काम करत त्यांनी आसामच्या जनतेला आश्वास्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील आसाममध्ये प्रचारसभा घेतली आहे. आता मात्र भाजप आणि काँग्रेसला आव्हान देण्यासाठी AIMIM ची एन्ट्री झाली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका करत आसाममध्ये निवडणुकीला रंगत आणली आहे.
मत हे सर्वात शक्तिशाली शस्त्र – ओवैसी
आसाममध्ये भाषण करताना असदुद्दीन ओवैसी यांनी मतदारांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीत मत हे सर्वात शक्तिशाली शस्त्र असून त्याचा वापर शहाणपणाने आणि राजकीय चातुर्याने केला पाहिजे, असे ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीतील आघाडीच्या दाव्यांना फेटाळून लावत, असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट केले की, जास्तीत जास्त एआययूडीएफचे उमेदवार विधानसभेत पोहोचावेत, हे सुनिश्चित करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हे देखील वाचा : पाक, चीन कोणालाच सोडणार नाही! भारतीय वायुसेनेत ‘तेजस Mk-1A’ ची एन्ट्री; टेस्टिंग अंतिम टप्प्यात
काँग्रेसमुळे भाजप सत्तेत: ओवैसी
आसाम विधानसभा निवडणुकीवर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “आम्ही एआययूडीएफ पक्षाच्या समर्थनार्थ दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहोत. आमचा विश्वास आहे की, हिमंता बिस्वा सरमा मुख्यमंत्री असताना आसाममध्ये द्वेषाचे राजकारण सुरू आहे. भाजपला रोखण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे. काँग्रेस पक्षामुळेच हिमंता बिस्वा सरमा आणि भाजप आज सत्तेत आहेत. ५०,००० हून अधिक मुस्लिमांची घरे पाडण्यात आली आणि ते बेघर झाले. अशा परिस्थितीत, त्यांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बद्रुद्दीन अजमल यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे.”
हे देखील वाचा : अमित शाहांच्या ‘रोड शो’ने फिरणार वारे? ममता दीदींच्या घराजवळ रॅलीला हिंसक वळण, चपला फेकल्या अन्..
समान नागरी संहितेला हिंदू कोड बिल संबोधणे
समान नागरी संहितेवर बोलताना ओवैसी म्हणाले की, धर्मस्वातंत्र्य हा संविधानांतर्गत एक मूलभूत अधिकार आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत विचारस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा उल्लेख आहे. समान नागरी संहितेच्या नावाखाली हिंदू कोड बिल लागू करण्याचा हेतू आहे, जे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे.
आसाममध्ये निवडणुका कधी?
आसाम विधानसभा निवडणुका ९ एप्रिल रोजी होणार आहेत. मतदान एकाच टप्प्यात होईल आणि निकाल ४ मे रोजी जाहीर केला जाईल. राज्यात १२६ विधानसभा जागा असून अंदाजे २ कोटी २५ लाख मतदार आहेत. आसाममधील मुख्य लढत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेस यांच्यात आहे.






