
Ayodhya Ram Mandir Donation Theft, SIT Report Ram Mandir Ayodhya, CM Yogi Adityanath Action,
अहवाल सादर केल्यानंतर माहिती अहवाल सादर केल्यावर एसआयटी पथकाचे सदस्य विजय विश्वास पंत म्हणाले, “आम्ही अयोध्या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल अतिरिक्त मुख्य सचिवांना सादर केला आहे. हा एक अत्यंत गोपनीय तपास असल्याने, निष्कर्षांबाबत सध्या अधिकृत भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही.” या प्रकरणाचा अंतिम अहवाल पुढील १५ दिवसांत सादर केला जाणार आहे.
राम मंदिरातील देणगीचे पैसे आणि नोटा मोजताना काही कर्मचाऱ्यांनी पैशांचा अपहार केल्याचे कथित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे कर्मचारी पैसे चोरून ते बाहेर काढण्यासाठी चक्क बाथरूमचा वापर करत असल्याचा संशय आहे.
देणगी मोजण्याच्या कार्यपद्धतीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. पैसे मोजणारे कर्मचाऱ्यांना गणवेश बंधनकारक करण्यात आला होता. पण ते कर्मचारी नियुक्त गणवेशात येत नसल्याचे आढळून आले आहे. इतकेच नव्हे तर काम संपवून बाहेर जाताना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केल्या जाणाऱ्या तपासणीत मोठी हलगर्जी होत असल्याच्या तक्रारी आहेत.
या संपूर्ण गैरव्यवहारात पैसे मोजणारे कर्मचारी, राम मंदिर ट्रस्टचे काही सदस्य आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. मात्र, अहवालात नक्की कोणावर ठपका ठेवण्यात आला आहे, ती नावे अद्याप गोपनीय ठेवण्यात आली आहेत.
जून महिन्याच्या सुरुवातीला अयोध्या राम मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या अंतर्गत ऑडिट (हिशेब तपासणी) दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दानपेटीतील काही रोख रक्कम आणि इतर वस्तू गायब झाल्याची शक्यता ऑडिटमध्ये वर्तवण्यात आली. यानंतर मंदिर परिसर आणि दानपेटीच्या आसपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये मंदिरातीलच एका कर्मचाऱ्याची हालचाल संशयास्पद आढळल्याने, ट्रस्टकडून अंतर्गत पातळीवर गुप्तपणे चौकशी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला हे प्रकरण अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते.
७ जून रोजी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने या वादाला मोठे राजकीय वळण मिळाले. लखनौ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी योगी सरकारवर सडकून टीका केली. अखिलेश यादव म्हणाले, “अयोध्या राम मंदिरातील चढ्याव्याबाबत जी माहिती समोर येत आहे, ती अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. जर भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारची देखरेख यंत्रणा इतकीच प्रभावी असती आणि त्यांचे दूरबीन व ड्रोन योग्य काम करत असते, तर आज विरोधकांना प्रश्न विचारण्याची वेळच आली नसती.”
– अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष