नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावरून आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील निवडणूक आयोगात उशिराने उपस्थित राहिल्याने सुनावणी 15 मिनिटे उशिराने सुरू झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आज युक्तिवाद करणार असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. अजित पवार गटाने गेल्या सुनावणीवेळीदेखील युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोग अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेणार आहे. अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शरद पवार गटाची भूमिका निवडणूक आयोग ऐकणार आहे. दोघांच्या युक्तिवादातील मुद्द्यांचा विचार करून निवडणूक याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.
नीरज किशोर कौल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात
अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवारांची अध्यक्ष म्हणून निवड योग्य आणि कायद्याला धरुन आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करु शकत नाही, असा युक्तिवाद नीरज किशोर कौल यांनी केलाय. पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीच नाही. पक्षांतर्गत नियुक्त्या निवडणुकीनुसार झालेल्या नाहीत, असा युक्तिवाद कौल यांनी केलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आमच्या सोबत आहेत. त्यांच्या सहीने सर्व नियुक्त्या झाल्या आहेत. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे, असा युक्तिवात अजित पवार गटाने केलाय.
बहुमत आमच्याकडे, अजित पवार गटाचा दावा
पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. आमच्याकडे विधीमंडळातील बहुमत आहे. दीड लाखापेक्षा जास्त प्रतित्रापत्र आमच्याकडे आहेत. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. दरम्यान, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे नीरज कौल यांचा युक्तिवादावर मनु सिंघवी काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महाराष्ट्रातील 53 पैकी 42 आमदार आमच्याकडे आहेत. तसेच नागालँडचे 7 आमदार आमच्यासोबत आहेत, असं अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने शिवसेना प्रकरणाचा दाखला दिलाय. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा दावा अजित पवार गटाने केलाय. अजित पवार गटाने सादिक अली प्रकरणाचा दाखला दिला.






