प्रियांका गांधींची खासदारकी अडचणीत; भाजपकडून केरळ हायकोर्टात आव्हान
राहुल गांधींचं रेकॉर्ड मोडत प्रियांका गांधी वायनाडमधून खासदार बनल्या. मात्र काँग्रेसच्या नेत्या व केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या विजयाला आव्हान देण्यात आले आहे. वायनाडमधील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार नव्या हरिदास यांनी केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून प्रियांका यांच्या विजयाला आव्हान देण्यात आले आहे.
प्रियांका गांधी यांचे बंधू व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडसह रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर प्रियांका यांनी ही निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला. राहुल गांधींहून अधिक मताधिक्याने त्या विजयी झाल्या आहेत.
#WATCH | Kozhikode, Kerala: BJP leader Navya Haridas says, “We have filed an election petition yesterday in the High Court against Congress MP Priyanka Gandhi Vadra. It clearly states that the nomination papers were misleading and many important things were hidden from the… pic.twitter.com/RUc5AKcDKp
— ANI (@ANI) December 22, 2024
भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी या विजयाला आव्हान दिले आहे. त्यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, प्रियांका यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्या आणि कुटुंबाच्या संपत्तीची योग्य माहिती दिलेली नाही. त्यांनी चुकीची माहिती दिली असून हे आदर्श आचारसंहितेच्या विरुध्द आणि भ्रष्ट वागणुकीसमान आहे.
प्रियांका यांनी महत्वाची माहिती लपवल्याचा दावा हरिदास यांनी एएनआयशी बोलताना केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही काल केरळ हायकोर्टात प्रियांका गांधी यांच्या विजयाविरोधात निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यामुळे स्पष्टपणे म्हटले आहे की, उमेदवारी अर्जातील माहिती अपूर्ण आहे. प्रियांका गांधी आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीविषयी महत्वपूर्ण बाबी लपवण्यात आल्या आहेत.
नव्या हरिदास यांनी सुरूवातीला निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार केली होती. मात्र, आयोगाने त्याला योग्यप्रकारे हाताळले नाही, असेही हरिदास यांनी म्हटले आहे. दरम्यान, या याचिकेवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रमोद तिवारी यांनी ही याचिका म्हणजे स्वस्तातला प्रचार असल्याचे म्हटले आहे. ही याचिका फेटाळली जाईल आणि त्यांना दंड ठोठावला जाईल, असा विश्वास असल्याचेही तिवारी म्हणाले.
निवडणुकीत प्रियांका गांधी यांना तब्बल 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली होती. तर नव्या हरिदास यांना केवळ 1 लाख 9 हजार 939 मते मिळाली. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सत्येन मोकेरी यांनी 4 लाख 10 हजार 931 मते मिळवत प्रियांका यांना जोरदार टक्कर दिली होती.