मेरठ : शेतकरी कायद्यांसंदर्भात प्रचंड मोठे आंदोलन उभे करून ते यशस्वी करून दाखवणाऱ्या भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचेच पुनरागमन होईल. सुरुवातीला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. पण मध्येच ते पद सोडून राष्ट्रपती होतील.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या जागी अमित शाह पंतप्रधानपदावर बसतील. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशाच्या गृहमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील. सपा आमदार अतुल प्रधान यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राकेश टिकैत मेरठमध्ये आले होते. यावेळी राकेश टिकैत यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात माध्यमांना काही प्रश्न विचारले. यावर राकेश टिकैत यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली.
देशात भाजपाच सरकार स्थापन करेल. पण पंतप्रधानपदी नवा चेहरा दिसू शकतो. तीन राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली. या निकालावर टिकैत यांनी भाष्य केले. सगळे एकत्र आले नाही तर सर्वांसाठी कठीण होईल, असेही ते म्हणाले.






