जागावाटपात भाजपची कोंडी कायम; JDU ची १०३ उमेदवारांची यादी अंतिम (Photo Credit- X)
Bihar Election 2025: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) जागावाटपावर अद्याप अधिकृत सहमती झाली नसली तरी, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षाने सर्व जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू सुमारे १०३ जागांवर निवडणूक लढवणार आहे, परंतु याची औपचारिक घोषणा एनडीएचे शीर्ष नेते योग्य वेळी करतील.
जेडीयूने कामगिरी असमाधानकारक असलेल्या चार विद्यमान आमदारांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, दोन आमदारांनी पक्ष बदलल्यामुळे त्यांच्या जागीही नवे चेहरे उतरवले जातील. अशा प्रकारे एकूण सहा जागांवर बदल करण्यात आले आहेत.
जेडीयूचा दावा आहे की, जनतेचा अभिप्राय आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मूल्यांकन या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘जे आमदार आपापल्या मतदारसंघांत सक्रिय नाहीत किंवा जनतेच्या असंतोषाला सामोरे जात आहेत, त्यांना दुसरी संधी दिली जाणार नाही,’ असे केंद्रीय नेतृत्वाने आधीच स्पष्ट केले होते, अशी माहिती जेडीयूच्या एका नेत्याने दिली.
दरम्यान, भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘एनडीएत सर्व काही ठीक आहे’ असे स्पष्ट केले असून, जागावाटप आणि उमेदवारांच्या यादीवर एक-दोन दिवसांत निर्णय होईल आणि लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल, असे सांगितले आहे.