संग्रहित फोटो
इचलकरंजी/राजेंद्र पाटील : इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे. आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता शिंदेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मंगळवार दिनांक १४ रोजी मुंबईत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील राजकारणात एक मोठा भूकंप होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
माजी आमदार हळवणकर व आमदार राहूल आवाडे गटाच्या एकत्रीकरणानंतर भाजपला स्थानिक पातळीवर मोठी बळकटी मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आघाडीतील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी पक्षाच्या वतीने मोठी तयारी सुरू आहे. त्यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या घडामोडीनंतर इचलकरंजीतील निवडणूक लढतीत भाजप अधिक आक्रमक होणार असून, महायुतीतील सत्ताधारी गटालाच धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आघाडीतीलही काही घटक पक्षांचे माजी नगरसेवकही भाजपच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आधीच रंगली आहे. अशातच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विकासकामांबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून याचं नाराजीचा फायदा घेत आगामी निवडणुकीत शहरातील सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नेत्यांसोबतच भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांचाही या निवडणुकीत मोठा सहभाग असणार आहे.
भाजपने मागील काही महिन्यांपासून शहरात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. विशेषतः हळवणकर आणि आवाडे गटाच्या एकत्रीकरणानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माजी नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानंतर कार्यकर्त्यांची संख्या वाढून प्रचारयंत्रणेला अधिक जोर मिळणार आहे. या घडामोडीमुळे निवडणुकीत सर्व पक्षांची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीसमोर भाजपचे आव्हान अधिक गंभीर होणार असून, सत्ताधारी गटाला आपली गढी टिकवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.स्थानिक राजकारणात बदलत्या समीकरणांचा हा टप्पा निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता भाजपच्या या प्रवेश सोहळ्याकडे लागल्या आहेत.