नवी दिल्ली : गेल्या 145 दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप आज झाला. यावेळी झालेल्या भाषणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. भाजपचे लोक घाबरट आहेत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
‘भारत जोडो’ यात्रेचा 145 दिवसांच्या प्रवासानंतर आज या यात्रेचा समारोप झाला. या समारोपाच्या जनसभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले. या जनसभेत बोलताना राहुल गांधी भावूक झाले होते. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. तर, भाजपचे लोक घाबरट आहेत. जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला न घाबरता जगायला हवे, हे मी महात्मा गांधीजींकडून शिकलो. मी चार दिवस इथे फिरलो.
जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिले नाही
जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिले नाही, तर खूप प्रेम दिले. अगदी कौतुकाने माझे स्वागत केले. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू केलेला पायी प्रवास कठीण नसेल, असे मला वाटले. मात्र, कन्याकुमारी येथून सुरुवात केल्यावर लगेचच माझा गुडघा दुखायला लागला. मात्र, काश्मीरला येईपर्यंत ते दुःख दूर झाले, असे राहुल गांधी म्हणाले.
हिंसेची वेदना मी समजू शकतो
जे लोक हिंसा घडवून आणतात, त्यांना याचे दुःख कधीही समजणार नाही. मात्र, या हिंसेची वेदना मी समजू शकतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना समजू शकत नाही. मी समजू शकतो. जेव्हा मी अमेरिकेत होतो, तेव्हा मला एक फोन आला आणि त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे, अशी आठवण सांगत, असे फोन जवानांच्या घरी येणे बंद झाले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
माझ्याकडे घर ही संरचना नाही
माझ्यासाठी घर ही संरचना नाही, तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. ज्याला तुम्ही काश्मिरियत म्हणता, मी ते घर मानतो. ही काश्मिरियत आहे का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली. या पृथ्वीवर दोन विचारधारा आहेत, त्यांच्यात वर्षानुवर्षे नाते आहे. त्याला आपण काश्मिरियत म्हणतो, असे राहुल गांधी म्हणाले.