
Congress Protest
Congress SIR Protest : निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रान पेटणार आहे. काँग्रेसकडून दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी जोरदार विरोध प्रदर्शन होणार आहे. याबाबतच आता मोठी अपडेट समोर आली असून रॅलीला दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पोलिसांनी सुरक्षा, सीसीटीव्ही, वाहतूक आणि भाषणांबाबत अनेक अटी घातल्या आहेत. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील (SIR) कथित अनियमिततेवरून काँग्रेसने हे आंदोलन आयोजित केले आहे.
पोलिसांच्या पत्रानुसार, आयोजकांना रॅली सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपवावी लागणार आहे. त्यानंतर मैदानावर उपस्थित राहण्यास किंवा रात्री मुक्काम करण्यास परवानगी नसेल. मैदान वापरण्यासाठी संबंधित जमीनमालक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणेही आवश्यक आहे.
Narendra Modi : अन् अचानक पंतप्रधान मोदी म्हणाले, योगीजींचे आभार माना
रॅलीदरम्यान प्रवेशद्वार, बाहेर पडण्याचे मार्ग, व्यासपीठ आणि प्रेक्षकांच्या जागी हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागतील. रेकॉर्डिंगची सुविधा, किमान पाच स्क्रीन असलेली मॉनिटरिंग व्यवस्था आणि स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी आयोजकांना स्वयंसेवकांची ओळख स्पष्ट होईल अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. पाणी, स्वच्छतागृहे आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधांचीही तरतूद करावी लागेल. वाहनांचे पार्किंग वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या ठिकाणीच करावे लागणार आहे.
जात, पंथ किंवा रंगावरून सार्वजनिक सलोखा बिघडवणारी टिप्पणी होऊ नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एखाद्या वक्त्याने प्रक्षोभक किंवा धमकीवजा भाषण केल्यास ध्वनिक्षेपक बंद करून संबंधित वक्त्याला मंचावरून उतरवण्याची जबाबदारी आयोजकांवर असेल. पोलिसांच्या अटींचे पालन न झाल्यास परवानगी रद्द होऊ शकते.
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यापूर्वी पोलिसांनी रॅलीच्या तयारीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणात कथित अनियमितता आणि मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावरून पक्षाने निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
रॅलीला परवानगी मिळाल्यानंतर आता काँग्रेसच्या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पोलिसांच्या अटींचे पालन करत सभा शांततेत पार पाडण्याचे आव्हान आयोजकांसमोर असेल.
Ans: दिल्ली पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रॅली आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
Ans: आयोजकांना सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियंत्रण कक्ष, पुरेशी सुरक्षा, पाणी व शौचालयांची व्यवस्था करावी लागेल. रॅली सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपवणे, रात्री मुक्काम न करणे आणि प्रक्षोभक भाषणांना आळा घालणेही आवश्यक आहे.
Ans: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता आणि मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावर हे आंदोलन आयोजित केले जात आहे.