नवी दिल्ली – झारखंडच्या हजारीबागमध्ये कर्ज वसुलीसाठी गेलेल्या एजंटांनी एका शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडल्याची संतापजनक गुरूवारी घटना घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. ती ४ दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी आली होती. पोलिसांनी महिंद्रा फायनान्सच्या ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला घेराव घातला आहे. चारही आरोपी सध्या फरार आहेत.
हजारीबागच्या सिजुआ गावातील दिव्यांग शेतकरी मिथिलेश प्रसाद मेहता यांनी महिंद्रा फायनान्सकडून २०१८ मध्ये ट्रॅक्टर फायनान्स केले होते. ते नियमितपणे हप्ते भरत होते. पण १ लाख २० हजार रुपयांचे ६ हफ्ते अजून पेंडिंग होते. आर्थिक चणचणीमुळे त्यांना ते फेडण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढून १ लाख ३० हजारांवर पोहोचले.
फायनान्स कंपनीचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी आले, तेव्हा त्यांनी मुदलाशिवाय १२ हजार रूपये अतिरिक्त मागितले. मेहता यांनी ही रकम देण्यास नकार दिला. त्यानंतर ते परत गेले. गुरूवारी सकाळी ११.३० च्या वा. ते ट्रॅक्टर जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले. इचाक ठाणे क्षेत्रातील बरियठ गावालगत नातेवाईक ट्रॅक्टरपुढे गोळा झाले. त्यांनी कर्जाचे १.२० लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली. त्यावर कर्मचाऱ्याने आणखी १२ हजार रुपये मागितले.
त्यांनी नकार दिल्यानंतर फायनान्स कंपनीचे कर्मचारी ट्रॅक्टरवर चढले. त्यांनी समोरून हटा नाही तर ट्रॅक्टर अंगावर घालण्याची धमकी दिली. त्यानंतरही नातेवाईक ट्रॅक्टरपुढून हटले नाही. त्यामुळे रिकव्हरी एजंटांनी ड्रायव्हरला ट्रॅक्टर पुढे नेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला चिरडले. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून गेले.