पालघर/संतोष पाटील: ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पक्षाने मुख्य आरोपी म्हणून ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर तीव्र आरोपांची सरबत्ती केली होती, त्याच चौधरी यांनी रविवारी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानंतर जिल्ह्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला असून “भाजपने केलेले आरोप कुठे गेले?” असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांकडून मोठ्या आवाजात विचारला जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी दाखवून दिले की, गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भाजपने चौधरी यांना मुख्य आरोपी ठरवत राज्यभर मोठे आंदोलन उभे केले होते. त्या काळात काशिनाथ चौधरी हेच या हत्याकांडामागील प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त धारेवर धरले होते.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर साधू हत्याकांडामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा ऱ्हास झाल्याचे भाजपचे कटाक्ष होते. एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेपासून वेगळे होताना “साधू हत्याकांड सहन झाले नाही, म्हणूनच उठाव केला” असे विधान केले होते.मात्र आता याच चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विधानांची विश्वसनीयता आणि भाजपने केलेले आरोप याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
डहाणू येथे आयोजित कार्यक्रमात काशिनाथ चौधरी यांनी भाजपचा झेंडा हाती घेत औपचारिक प्रवेश जाहीर केला. या प्रसंगी खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भारत राजपूत उपस्थित होते.या कार्यक्रमात चौधरी यांनी 3000 हून अधिक कार्यकर्त्यांसह भाजपा प्रवेश केला, तर डहाणूचे माजी सभापती प्रवीण गवळी यांनीदेखील कमळ हाती घेतले. जिल्ह्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.गडचिंचले साधू हत्याकांड—काय घडले होते? 16 एप्रिल 2022 रोजी रात्री, सुरतला निघालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाची गडचिंचले येथे जमावाने अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
या प्रकरणानंतर200 हून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली,108 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आणि तपास अनेक महिन्यांपर्यंत सुरू राहिला.ही घटना महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडली. त्यानंतर भाजपने या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर मोठे राजकीय हल्ले चढवले होते.
या प्रकरणातील ‘मुख्य आरोपी’ म्हणविलेल्या काशिनाथ चौधरींचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर विरोधकांकडून भाजपच्या भूमिकेतील अचानक बदलावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
“ज्यावर गंभीर आरोप करत आंदोलन उभे केले, त्या व्यक्तीलाच भाजपने पक्षात कसे घेतले? मग ते आरोप खोटे होते की आता फायद्याचे गणित बदलले?”
जिल्ह्यातील निवडणूक वातावरण तापत असताना ही घडामोड स्थानिक राजकारणाला नवे वळण देणारी ठरत आहे.
Ans: पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांडात ‘मुख्य आरोपी’ म्हणून ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने आरोप केले होते, त्याच चौधरी यांचा रविवारी पालघर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश झाला. यामुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.
Ans: भाजप नेत्यांनी चौधरी हे साधू हत्याकांडाचे “प्रमुख सूत्रधार” असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारवर तीव्र टीका केली होती. त्यांनी चौधरींना “मुख्य आरोपी” म्हणून राज्यभर आंदोलने केली होती.
Ans: राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इतर पक्ष विरोध व्यक्त करत म्हणत आहेत— “ज्यावर गंभीर आरोप केले, त्यालाच पक्षात कसे घेतले?” “ते आरोप खोटे होते की आता राजकीय फायदे लक्षात घेऊन भूमिका बदलली?” असा सवाल केला जात आहे.






