भारतीय संघ ज्युनियर हॉकी विश्वचषकासाठी चेन्नईत दाखल(फोटो-सोशल मीडिया)
Junior Men’s Hockey World Cup 2025: ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे खेळला जाणार आहे. या मेगा स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघ शनिवारी चेन्नईत दाखल झाला आहे. भारतीय संघाला चिली, स्वित्झर्लंड आणि ओमानसह पूल बी मध्ये स्थान दिले गेले आहे.
स्पर्धेची तयारी करण्यासाठी, ज्युनियर संघाने या वर्षाच्या सुरुवातीला बर्लिनमध्ये झालेल्या चार देशांच्या स्पर्धेत अव्वल आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसोबत सामना केला. त्यानंतर भारतीय संघाने बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड्सला भेट दिली. संघाने बेंगळुरूमधील शिबिरांमध्ये सखोल प्रशिक्षण देखील घेतले आहे.
माजी गोलकीपर आणि देशाच्या ऑलिंपिक पदकात महत्त्वाची भूमिका बजावणारे पीआर श्रीजेश हे भारतीय ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. रोहित भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. भारतीय संघाने अलीकडेच मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कपमध्ये रौप्य पदकाची कामई केली आहे.
कर्णधार रोहित नेमकं काय म्हणाला?
चेन्नईमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहितने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी चेन्नईमध्ये असणे हा आनंददायी बाब आहे. आम्ही या क्षणासाठी अनेक महिने तयारी करत आलो आहोत आणि जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध स्पर्धा करण्यास आणि मैदानावर आमचे सर्वोत्तम देण्यास उत्सुक देखील आहोत. तामिळनाडूमध्ये हॉकी संस्कृती ही खूप उत्तम आहे, म्हणून आम्ही येथे खेळण्यास उत्सुक आहोत. मी सर्व चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊन आम्हाला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे.”
संघातील खेळाडू अमीर अलीने देखील अशीच भावना व्यक्त केली आहे. तो म्हटलं आहे की, “आपल्या देशात विश्वचषकात खेळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. जवळजवळ दहा वर्षांपूर्वी, भारताने यजमान म्हणून विश्वचषक जिंकला होता आणि आम्ही चेन्नईमध्ये तो इतिहास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. संघाला त्याच्या तयारीबद्दल विश्वास आहे. पुढील आव्हानांसाठी पूर्णपणे तयार राहण्यासाठी आम्ही येथे सराव करत राहणार आहोत.”
भारतीय संघ २८ नोव्हेंबर रोजी चिलीविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी ओमान आणि २ डिसेंबर रोजी स्वित्झर्लंडविरुद्ध सामने होणार आहेत. भारतीय संघ यापूर्वी दोनदा (२००१ आणि २०१६) विश्वविजेता संघ राहिला आहे. १९९७ मध्ये संघाला उपविजतेपदावर समाधान मानावे लागेल.






