रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास
Patna Politics: बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाला (राजद) सत्तेपासून दूर राहावे लागले. अपेक्षित ‘मोठा विजय’ हुकल्याने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातही कलह उफाळला आहे. या पराभवानंतर कुटुंबातील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे.
लालू यादव यांना किडनी दान करणाऱ्या त्यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनीच प्रथम बंडाचा सूर लावत, तेजस्वी यादव आणि त्यांच्या सल्लागारांवर गंभीर आरोप केले. त्यांनी राजकारण आणि कुटुंब दोन्हीपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. रोहिणींच्या आरोपांनंतर आता तेजस्वी यादव यांच्या आणखी तीन बहिणींनी राबडी निवासस्थान सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे यादव कुटुंबातील अंतर्गत कलह आणखी गहिरा झाल्याचे दिसत आहे.
Bihar Election 2025: ओवेसीमुळे इंडियाचे आठ जागांवर नुकसान; MIMचा पाच जागांवर मिळवला विजय
राजदच्या पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी थेट तेजस्वी यादव आणि त्यांचे जवळचे सहकारी, राज्यसभा खासदार संजय यादव, यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीतील पराभवाबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांच्याशी असभ्य वर्तन करण्यात आले आणि चप्पलांनी मारहाण करण्याची धमकी दिल्याचा रोहिणींचा आरोप आहे. या घडामोडीनंतर रोहिणींनी केवळ पक्षीय राजकारणातून माघार घेतली नाही, तर कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. त्या प्रथम दिल्लीला, त्यानंतर सिंगापूरला स्थलांतरित झाल्या असून सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडत आहेत.
रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप करून घर सोडल्यानंतर, लालू प्रसाद यादव यांच्या आणखी तीन मुलींनी—चंदा यादव, राजलक्ष्मी यादव आणि रागिनी यादव—राबडी निवासस्थान सोडल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही बहिणी आपापल्या कुटुंबियांसह पाटण्याहून दिल्लीला रवाना झाल्या.
लालू कुटुंबातील इतक्या मुली एकाच वेळी घर सोडणे ही अभूतपूर्व घटना मानली जात असून, बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुटुंबातील तणाव आणि अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. सत्तावाटपापासून घरातील वातावरणापर्यंत सर्वच पातळ्यांवर असंतोष निर्माण झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
राजदला विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळेल, अशी अपेक्षा होती. राबडी निवासस्थानात तर उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली होती आणि सर्व बहिणी तिथे एकत्र जमलेल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष निकालांनी तेजस्वी यादव यांचे सर्व दावे धुळीस मिळाले आणि राजदला कठोर पराभवाचा सामना करावा लागला.
या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील दबलेल्या नाराजीचा उद्रेक झाला. कुटुंबातील बंडाची मूळ कारणीभूत ठरलेली ही पराभवाची धडक, वारशाने मिळालेल्या सत्तेच्या अंतर्गत ताणतणावांना समोर आणणारी ठरली.
या घडामोडींमुळे लालू कुटुंबात आता घरगुती उलथापालथ निर्माण झाली आहे.






