
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना 'सनातन मार्तंड' पुरस्कार; वाराणसीत संत-महंतांच्या उपस्थितीत गौरव
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ आहे. सनातन धर्म, संत समाज, भारतीय संस्कृती आणि धर्मरक्षणासाठी शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहीन, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. वाराणसी येथे अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेच्या वतीने त्यांना ‘सनातन मार्तंड’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांना ‘धर्मध्वजाधारक’ ही उपाधीही बहाल करण्यात आली.
वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान आयोजित ‘संस्कृती संसद 2026’ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते. देशभरातील हजारो संत-महंत, धर्माचार्य, विचारवंत आणि युवक या तीन दिवसीय कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी उपस्थित साधू-संतांवर पुष्पवृष्टी करून त्यांना वंदन केले.
अखिल भारतीय संत समिती आणि विविध धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला हा सन्मान केवळ माझा नसून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, वारकरी संप्रदायाचा आणि युवकांचा आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. संत समाजाने दिलेला हा सन्मान सनातन धर्माच्या संवर्धनाची जबाबदारी अधिक दृढ करणारा आहे, असेही ते म्हणाले.
काशी ही भारताची आत्मा असून काशी आणि महाराष्ट्राचे नाते शतकानुशतके जुने आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून, तर संत नामदेवांनी पंजाबपर्यंत भागवत धर्माची पताका नेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीचे गागाभट्ट महाराष्ट्रात आले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि शौर्याचा गौरव केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ या विचारांचा उल्लेख करत शिंदे यांनी पालघरमधील साधूंच्या हत्येनंतर धर्मरक्षणासाठी सत्तेचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. सत्ता नव्हे, तर सिद्धांत महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री असतानाही आणि आज उपमुख्यमंत्री असतानाही आपण कार्यकर्ता म्हणूनच काम करतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय, व्यक्तीच्या नावापुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. गोसंवर्धनाला शेतकऱ्यांचे उत्पन्न, जैविक शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडून गोशाळा आत्मनिर्भर करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ धाम, उज्जैनचा महाकाल कॉरिडॉर, चारधाम, सोमनाथ, द्वारका आणि रामेश्वरमच्या विकासाचा उल्लेख करत शिंदे यांनी या उपक्रमांना सनातन संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे प्रतीक म्हटले. योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि ‘नमामि गंगे’ अभियानाचाही त्यांनी गौरव केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य, दिव्य, सुरक्षित आणि स्वच्छ करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिरांसोबत रुग्णालये, तीर्थक्षेत्रांसोबत आधुनिक शाळा आणि विकासासोबत सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास, योग, संस्कृत, भगवद्गीता आणि नैतिक मूल्यांचे संस्कार नव्या पिढीला देण्याचे आवाहनही त्यांनी केले. संतांचे आशीर्वाद, युवकांची शक्ती आणि शासनाचा सेवासंकल्प यांच्या माध्यमातून भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचा निर्धार व्यक्त करत ‘ना झुकेगा स्वाभिमान, ना बदलेगा विचार’ या घोषणेने त्यांनी भाषणाचा समारोप केला.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरीजी, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष जगद्गुरू अविचल देवाचार्य महाराज, समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती महाराज, कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्यासह देशभरातील संत-महंत, धर्माचार्य आणि विद्वान उपस्थित होते.
Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'सनातन मार्तंड' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Ans: त्यांना 'धर्मध्वजाधारक' ही उपाधी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
Ans: अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.