२६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताचे प्रमुख पाहुणे असू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकारने फ्रान्सच्या राष्ट्रपतींना निमंत्रण पाठवले आहे.यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, पण ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
…तर हा विक्रम होईल
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये यावर्षी बॅस्टिल डे परेडमध्ये भाग घेतला. या परेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सन्माननीय पाहुणे बनवण्यात आले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन २६ जानेवारीला भारतात आले तर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणारे ते सहावे नेते असतील. 1976 पासून भारताने फ्रान्सच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिनासाठी एकूण पाच वेळा आमंत्रित केले आहे.
आतापर्यंत या फ्रेंच राष्ट्रप्रमुखांचा सहभाग होता
1976 मध्ये, फ्रान्सचे पंतप्रधान जॅक शिराक हे प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे पहिले नेते होते. यानंतर, 1980 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी गिसकार्ड डी’एस्टिंग, 1998 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक, 2008 मध्ये राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी आणि 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनात भाग घेतला. भारताने आतापर्यंत सर्वाधिक संख्येने फ्रेंच नेत्यांना प्रजासत्ताक दिनासाठी आमंत्रित केले आहे.






