भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं चर्चेत, RSS कडूनही पाठिंबा
भाजपमध्ये संघटनात्मक बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू पक्ष नव्या अध्यक्षांच्या शोधात आहे. या शर्यतीत काही नावं चर्चेत असताना भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतात आणि तीन नावं समोर आल्याचं वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिलं आहे. भाजपला गेल्या काही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला मतदारांची साथ मिळाली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये राबवलेल्या योजनांमुळे महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे यावेळी भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महिला अध्यक्षाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ २०२३ मध्ये संपला होता. पण त्यांना अध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आलं होतं. आता नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसात नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपने महिलांना राष्ट्रीय अध्यक्ष असावा या कल्पनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपकडून एका महिला नेत्याची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. या शर्यतीमध्ये तीन प्रमुख महिला नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.
निर्मला सीतारमण –
भाजपमध्ये सर्वात जास्त अनुभवी असलेल्या अर्थमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी पहिल्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. त्यांचा केंद्र सरकारमधील अनुभव देखील दीर्घ आहे. नुकताच त्यांनी भाजप मुख्यालयात जेपी नड्डा आणि सरचिटणीस बीएल संतोष यांच्यासोबत बैठक झाली. दक्षिण भारतातून त्यांचे येणे भाजपच्या दक्षिण विस्तार रणनीतीसाठी फायदेशीर ठरू शकते.
डी. पुरंदेश्वरी –
आंध्र प्रदेशमधील भाजपच्या माजी अध्यक्षा डी. पुरंदेश्वरी या अनुभवी आणि बहुभाषिक नेत्या आहेत. त्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी दुसऱ्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. त्यांना अनेक राजकीय पक्षांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. भाजपसाठीही त्यांनी चांगलं काम करून दाखवलं आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात देखील त्यांचा सहभाग होता.
वनथी श्रीनिवासन
अध्यक्षपदाच्या शर्यतीत वनथी श्रीनिवासन यांचंही नाव आघाडीवर असून त्या प्रबळ दावेदार माणल्या जात आहेत. त्या तमिळनाडूतील कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. १९९३ पासून त्या पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी संघटनेत अनेक पदे भूषवली आहेत. २०२२ मध्ये त्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य बनल्या होत्या आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य बनणाऱ्या त्या पहिल्या तमिळ महिला नेत्या होत्या.