जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री ते पहिले शिख पंतप्रधान; डॉ. मनमोहन सिंग यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. त्यांचा राजकीय प्रवास हा अर्थतज्ज्ञ ते पंतप्रधान असा थक्क करणारा आहे.
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी गुरुमुख सिंग यांच्या कुटुंबात झाला. गह पश्चिम पंजाब हे त्यांचं जन्म ठिकाण. आता हे ठिकाण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर हे ठिकाण पाकिस्तानात गेलं. फालणीनंतर त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये आलं. मनमोहन सिंग यांचा १९५८ मध्ये गुरुशरण कौर यांच्याशी विवाह झाला. मनमोहन सिंग यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशा तीन मुली आहेत.
मनमोहन सिंग हे जिज्ञासू आणि अभ्यासू विद्यार्थी होते. शैक्षणिक कारकिर्दीत ते कायमच प्रथम क्रमांकावर राहिले आहेत. त्यांनी हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतलं. १९५७ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी घेतली. १९६२ त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी. फिल केलं. तसंच त्यांनी इंग्लंड येथील केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली. या विद्यापीठात राइट्स पुरस्काराने त्यांना सन्मानितही करण्यात आलं.
चंदीगड विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. तसंच दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिक्षकही होते. १९७२ मध्ये मनमोहन सिंग हे अर्थ खात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार बनले. तर १९७६ मध्ये ते अर्थमंत्रालयाचे सचिव झाले. १९८० ते १९८२ त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम केलं. तर १९८२ मध्ये माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मनमोहन सिंग यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. १९८५ ते १९८७ या कालावधीत मनमोहन सिंग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. मनमोहन सिंग यांनी १९६४ मध्ये ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ – सस्टेन्ड ग्रोथ’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले.