इस्रोने 17 किमी उंचीवर गगनयानचं क्रू मॉडेल केलं लाँच, समुद्रात केलं सुरक्षित लँडिंग!

गगनयान टीव्ही-डी1 चे तीन मुख्य पॅराशूट यशस्वी चाचणी वाहन प्रक्षेपणानंतर काही मिनिटांत तैनात करण्यात आले.

    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून गगनयान मोहिमेचे (Gaganyaan Mission update) पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरित्या करण्यात आलं आहे. इस्रोला दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळालं आहे. क्रू एस्केप सिस्टम आणि क्रू मॉड्यूल 17 किमी उंचीवर लॉन्च करण्यात आलं. यानंतर बंगालच्या उपसागरातील श्रीहरिकोटापासून 10 किमी अंतरावर समुद्रात सुरक्षित लँडिंगही झालां.  या मोहिमेत नौदलाचाही सहभाग आहे.

    TV-D1 चं दुसऱ्या प्रयत्नात प्रक्षेपण

    मिशन गगनयान टीव्ही डी 1 चाचणी उड्डाण पूर्ण झाले आहे. क्रू एस्केप सिस्टमने उद्दिष्टानुसार कामगिरी केली. मिशन गगनयान यशस्वी झाले,” असे अंतराळ संस्थेने म्हटले आहे.
    गगनयान टीव्ही-डी1 चे तीन मुख्य पॅराशूट यशस्वी चाचणी वाहन प्रक्षेपणानंतर काही मिनिटांत तैनात करण्यात आले. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले, “TV-D1 मिशनच्या यशस्वी कामगिरीची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. गगनयान कार्यक्रमासाठी क्रू इजेक्शन सिस्टीमचे प्रात्यक्षिक करणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

    दोनदा वेळ पुढे ढकलण्यात आली

    या मोहीमेत रॉकेटचे प्रक्षेपण सुरुवातीला शनिवारी सकाळी 8 वाजता नियोजित होते, परंतु नंतर ते दोनदा एकूण 45 मिनिटांसाठी पुढे ढकलण्यात आले. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ नंतर म्हणाले की काही तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण वेळापत्रकानुसार जाऊ शकले नाही. ते म्हणाले की, टीव्ही-डी1 रॉकेटचे इंजिन निर्धारित प्रक्रियेनुसार सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर, इस्रोने  स्पष्ट केले की, मोहीमेचं “प्रक्षेपण रद्द करण्याचे कारण ओळखण्यात आले आहे आणि ते सुधारण्यात आलं आहे.

    TV-D1 इंजिन सुरुवातीला नियोजित वेळेनुसार फायर न झाल्याने दोन तासांचा विलंब आणि घबराट असताना इस्रोच्या शास्त्रज्ञांनी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. अंतराळयानाचे ‘क्रू मॉड्युल’ (ज्यामध्ये अंतराळवीर राहतील) आणि ‘क्रू एस्केप’ (क्रू रेस्क्यू सिस्टीम) यांनी विभक्त होताच श्रीहरिकोटा येथील मिशन कंट्रोल सेंटरमध्ये श्वास रोखून बसलेल्या शास्त्रज्ञांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. TV-D1 मोहीम पूर्णत: यशस्वी झाल्याचे इस्रोने जाहीर केले. योजनेनुसार पेलोड्स नंतर सुरक्षितपणे समुद्रात टाकण्यात आले.

    सिंगल-स्टेज लिक्विड प्रोपेलेंट रॉकेटच्या या प्रक्षेपणाद्वारे मानवांना अंतराळात पाठविण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘गगनयान’मध्ये इस्रोने एक पाऊल पुढे टाकले आहे. तीन दिवसांच्या गगनयान मोहिमेसाठी 400 किमी पृथ्वीच्या कक्षेत मानवांना अंतराळात पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे. इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की, या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांसाठी पाया तयार होईल, ज्यामुळे पहिला गगनयान कार्यक्रम सुरू होईल.