Devendra Fadnavis (Photo - X)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच जोर आला आहे. फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, तसेच शिक्षण खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. मात्र, या चर्चांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी आपल्या दिल्ली जाण्याच्या चर्चेवर मिश्कील प्रतिक्रिया दिली. “अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या,” अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्र सोडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांचे स्पष्टपणे खंडन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील जनतेने आपल्यावर राज्याची जबाबदारी सोपवली असून, ही जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Eknath Shinde Marathi Speech: मराठी ही सक्तीची नव्हे भक्तीची भाषा; एकनाथ शिंदेंचे विधान
फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह काही केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांना केंद्रात पाठवले जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले.
याबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी, “ज्यांना फुगे उडवायचे आहेत, पतंग उडवायची आहे, त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रातच आहे,” अशी भूमिका मांडली.
शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारासोबत महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आगामी काळात फडणवीस यांच्याकडे दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असा दावा राऊत यांनी केला होता.
मात्र, फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्यामुळे सध्या तरी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरच कायम राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पुढे नेमके कोणते राजकीय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



