Pahalgam attack PM Modi lands in India; convenes emergency meeting at Delhi airport with NSA Doval, EAM Jaishankar
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचे वातावरण पसरले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यांत 26 जणांना जीव गमवावा लागला आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. परंतु हल्ल्यांची माहिती मिळताच पंतप्रधान सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडला आणि बुधवारी (23 एप्रिल) सकाळी दिल्लीला परतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळवरतच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांशी पहलगाम हल्ल्याची यांच्याशी चर्चा केली. सध्या दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. तसेच दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत आहे. अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह लवकरच पहलगाममधील घटनास्थळांना भेट देणार आहेत. यापूर्वी अमित शाह यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पार्थीवांवर फुल पुष्पगुच्छ वाहून त्यांना श्रद्धांजली वाहली. अमित शाह आता हल्ल्यांत जखमी झालेल्यांना देखील भेट देणार आहेत. यानंतर दिल्ली परतल्यावर CSS बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार, सुरक्षा बंदोबस्त कडक करण्यात आले आहे. अनेक सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि कारवाई सुरु केली आहे.
याच वेळी पंतप्रधान मोदींनी सौदी दौऱ्यादरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच परिस्थितीच आढावा घेतला होता. यासंबंधी पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचीही चर्चा झाली. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
मंगळवारी (22 एप्रिल) हल्ल्यांची माहिती मिळताच पंतप्रधानांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. यासाठी क्राउन प्रिन्ससोबतची नियोजित बैठक देखील दोन तास उशिरा घेण्यात आली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहलगामधील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिल आहे की, मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. तसेच या घृणास्पद कृत्यामागील लोकांना लोकांना न्याय मिळवून दिला जाईल आणि दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. हा आमचा दहशतवादविरुद्ध लढण्याचा दृढ निर्धार आहे.
याचवेळी पहलगाम हल्ल्यांनतर अमेरिका, रशिया, इस्रायल, इराण आणि श्रीलंका या देशांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर “दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी केली जात आहे. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आम्ही या हल्ल्याचा निषेध करता. या कठीण काळात आम्ही भारतासोबत आहोत. दहशतवादविरोधात अमेरिका भारतासोबत उभा आहे. सध्या जागतिक स्तरावर भारतावरील दहशतवादी हल्ल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.