कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर (Kanpur) येथे एका शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी मुलांना कलमा शिकवण्यात आला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर भाजपासह इतर हिंदू संघटनांनी ही शाळा गंगाजलने (Purification Of School By Gangajal) शुद्ध केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच शाळा प्रशासनाने लेखी माफी मागवी, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.
कानपूरच्या सिसामऊ भागात फ्लोरेट्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना कलमा शिकवला जातो. या मुलांनी ही प्रार्थना घरी म्हटल्यानंतर पालकांच्या ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी मुलांना याबाबत विचारले असता, त्यांना शाळेत तसं शिकवल्याचं मुलांनी सांगितलं. तसेच कलमा न म्हटल्यास शिक्षक मारत असल्याची माहितीही मुलांनी पालकांना दिली.
शाळा प्रशासनाला याविषयी विचारल्यानंतर शाळेत सर्व धर्मियांच्या प्रार्थना शिकवल्या जात असल्याचं सांगण्यात आलं. ही प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरु असल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं. दरम्यान काही पालकांनी याविषयी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर शाळेत कोणत्याही धर्माची प्रार्थना शिकवल्या जाणार नाही, केवळ राष्ट्रगीत म्हटले जाईल, अशी प्रतिक्रिया एसपी निशंक शर्मा यांनी दिली.