नवी दिल्ली – कर्नाटकातील उडुपीमध्ये मुस्लिम विद्यार्थ्याची दहशतवादाशी तुलना केल्याप्रकरणी एका महाविद्यालयीन शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले. तेव्हा विद्यार्थ्याने त्यांना नाव सांगितल्यावर शिक्षक म्हणाले- अरे..! तू कसाबसारखा आहेस. असे म्हणून त्याचा अपमान केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या शिक्षकांच्या कमेंटवर विद्यार्थ्याने प्रत्युत्तर दिले. मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. यावेळी वर्गातील विद्यार्थी शांत बसल्याचे दिसत आहेत.
शिक्षकाच्या कमेंटवर विद्यार्थ्याने म्हटले, ‘२६/११ ही विनोद करण्यासारखी गोष्ट नाही. या देशात मुस्लीम असणं आणि अशा गोष्टी रोज ऐकणं हा काही विनोद नाही. तुम्ही माझ्या धर्माची चेष्टा करू शकत नाही, तीही अशा निंदनीय पद्धतीने. हा विनोद नाही.
विद्यार्थ्याला राग आल्याने शिक्षकाने प्रकरण हाताळले आणि त्याला सांगितले, ‘तू माझ्या मुलासारखा आहेस.’ यावर विद्यार्थ्याने विचारले, मी जर तुमच्या मुलासारखा आहे असे वाटते, तर मग तुम्ही तुमच्या मुलाला दहशतवाद्याच्या नावाने हाक माराल का? तेही इतक्या लोकांसमोर? तुम्ही व्यवसायाने शिक्षक आहात. त्यानंतर शिक्षकाने त्याला सॉरी म्हटले. तेव्हा तो विद्यार्थी म्हणाला की, सॉरी म्हटल्यावर ना तुमची विचारसरणी बदलणार आहे ना तुमच्या वागण्यात बदल होणार आहे






