पणजी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. ‘मुंबईचा दादा शिवसेनाच असल्याचं त्यांनी म्हटल. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. शेर कभी गिधड के धमकी से डरा नही करते, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. फडणवीस म्हणाले, मोदी सरकारने कुणाला व्हिक्टिमाईज केलं नाही. मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. आपलं नाव नेहमी चर्चेत कसं राहील याचा ते जास्त विचार करतात आणि ते याप्रकारचे काम करत असतात, असंही ते म्हणाले.
रोज सकाळी येऊन ते सगळ्यांच मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजे हे त्यांना माहीत आहे, असं सांगतानाच राऊत यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणं मांडावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
ईडी नेमकं काय करते आणि का करते हे ईडी सांगेल. संजय राऊतांच हे वक्तव्य एक व्हिक्टिम कार्डचा एक भाग आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन मांडावं, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. भाजप महाराष्ट्रात विरोधी पक्षात राहूनच काम करेल. भाजपला कोणाला शपथ देण्याची गरज नाही. प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही. पूर्ण शक्तीने आम्ही राज्यात सरकार स्थापन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते काँग्रेसवर टीका करत म्हणाले, त्यांच्या लोकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या केंद्रीय नेत्यांपासून गल्लीतल्या नेत्यांपर्यंत कोणीच कुणाचं ऐकत नाही. त्यामुळे ते कमकुवत झाले आहेत. लता मंगेशकर यांच्या स्मारकावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. लतादीदी महान होत्या. सर्वांनी मिळून त्यांचं चांगलं स्मारक निर्माण केलं पाहिजे.