दिल्लीमध्ये अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या युपीच्या व्यक्तीला अटक करण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
LPG Gas Shortage : नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये युद्ध पेटले असून आठ दिवसापासून हा संघर्ष सुरु आहे. यामुळे इराणने तेल आणि इंधनाचा व्यापार बंद केला. याचा परिणाम भारतावर झाला असून मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा भासत आहे. सामान्य लोकांच्या गॅस एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. तर व्यावसायिक गॅस (LPG Gas) मिळणे बंद झाले आहे. याचा परिणाम हॉटेल आणि खानावळींवर झाला आहे. यामुळे गॅसच्या काळाबाजार डोके वर काढत आहे. दिल्लीमध्ये (Delhi News) सुरक्षा यंत्रणेने गॅसचा काळाबाजार उघडकीस आणला असून एकाला अटक केली आहे.
सामान्य लोकांना गॅस तुटवड्याचा फटका बसला. गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे एजन्सीबाहेर गर्दी जमली आहे. मात्र यामुळे साठवणूक करुन जास्तीच्या पैशांनी गॅस विकणारे फोफावत आहेत. यावर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहे. दिल्ली पोलिसांनी जामियानगर भागातील असाच एक गॅसचा काळाबाजार पर्दाफाश केला आहेत. तसेच हे एलपीजी गॅस सिलेंडर अवैध असल्याचे देखील तपासामध्ये समोर आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकाला अटक केली.
हे देखील वाचा : चुलीवर भाकरी थापून सरकारचा निषेध; गॅस तुटवड्याविरोधात वाई तालुका काँग्रेस नेते आक्रमक
जामिया नगर पोलीस ठाण्याने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे, हा व्यक्ती उत्तर प्रदेशातून सिलिंडर आणून दिल्लीत जास्त किमतीत विकत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून ६२ एलपीजी सिलिंडर जप्त केले, त्यापैकी ४८ भरलेले आणि १४ रिकामे होते. १६ मार्च रोजी, पोलिसांचे एक पथक गस्त घालत असताना, जामिया नगर परिसरात एक टाटा एस गाडी संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे दिसून आले. गाडीमध्ये मोठ्या संख्येने सिलिंडर भरलेले होते. चालकाने विचारणा केली असता, तो कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही. त्यानंतर गाडीची झडती घेतली असता, ६२ सिलिंडर जप्त करण्यात आले.
मेरठहून दिल्लीला अवैध पुरवठा
तपासामध्ये समोर आले की, आरोपी पावतीशिवाय जास्त किमतीत सिलिंडर विकत होता. तो मेरठ (उत्तर प्रदेश) येथून सिलिंडर आणून जामिया नगरला पुरवत असे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने केवळ एक दिवस आधी अंदाजे ७० सिलिंडर आणून विकले होते. या संपूर्ण नेटवर्कमध्ये वाहन मालक मुकेश याचेही नाव समोर आले आहे, ज्याच्यासोबत हा अवैध धंदा चालवला जात होता. पोलीस आता मुकेशचा शोध घेत आहेत.
हे देखील वाचा : “आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग देवळांनातरी गॅस द्या; खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शहनवाज (वय वर्षे २८) अशी पटली असून, तो जामिया नगरमधील जोगा बाई एक्सटेंशन येथे राहणारा आणि मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा आहे. पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी तो मुकेशच्या संपर्कात आला, त्यानंतर त्याने हे अवैध काम सुरू केले.






