नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. नरेंद्र मोदींनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘भविष्यात काँग्रेसच्या पतनावर ‘हॉवर्ड’मध्ये अभ्यास होईल’, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच काहींच्या भाषणातून योग्यता समजून येते असे म्हणत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
पंतप्रधान मोदींनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, भारत सर्वांसाठी आशेचा किरण आहे. काहींना देशाची प्रगती पाहून दु:ख होत आहे. ‘ईडी’मुळे अनेकजण आमच्याविरोधात एकत्र आले आहेत. अपयश आल्यावर सरकारवर आरोप केले जातात. अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित, त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है’ अशा शब्दांत राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले, आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी आदिवासी समाजाचा गौरव तर वाढवलाच. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आदिवासी समाजाचा गौरव वाढतोय, आत्मविश्वास वाढतोय. त्यामुळेच हे सभागृह आणि संपूर्ण देश त्यांचा आभारी आहे. राष्ट्रपतीच्या भाषणात संकल्प ते सिद्धीचा मुद्दा मांडला. जनतेला त्यांनी आपल्या भाषणातून प्रेरणा दिली. प्रजासत्ताकाचे प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची उपस्थितीत ऐतिहासिकही आहे आणि देशाच्या कोट्यवधी बहिणी-मुलींसाठी प्रेरणाही आहेत, असेही त्यांनी सांगितले.