राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर
ग्रॅप-३ अंतर्गत अनावश्यक बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. माती खोदणे, पायाभरणीसाठी पाइलिंग, खंदक खोदणे आणि रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्पांमधील काही कामेही बंद राहणार आहेत. वाळू, सिमेंट यांसारख्या बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवरही निर्बंध असतील. स्टोन क्रशर, खाणकाम आणि प्रदूषणकारी हॉटमिक्स प्रकल्प बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये बीएस-३ पेट्रोल आणि बीएस-४ डिझेल चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आंतरराज्यीय डिझेल बसनाही दिल्लीमध्ये प्रवेश करता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता डिझेल जनरेटरच्या वापरावरही निर्बंध असतील.
शाळांचे ऑनलाईन वर्ग
प्रदूषणाचा मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन पाचवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवून ऑनलाईन वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठी घरून काम किंवा संमिश्र कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ग्रॅपमध्ये प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार चार टप्पे आहेत.
आयोगाकडून प्रतिबंधात्मक निर्णयाची शक्यता
एक्यूआय २०१ ते ३०० असताना पहिला, ३०१ ते ४०० असताना दुसरा, ४०१ ते ४५० असताना तिसरा आणि ४५० पेक्षा अधिक झाल्यास चौथा टप्पा लागू होतो. मात्र, प्रदूषणाचा अंदाज आणि परिस्थिती लक्षात घेऊन आयोग प्रतिबंधात्मक निर्णय घेऊ शकतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
1. दिल्लीतील वायुप्रदूषणाची स्थिती किती गंभीर आहे?
दिवाळीपूर्वीच दिल्ली-एनसीआरमधील वायुप्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले असून, दिल्लीचा AQI ३८२ नोंदवण्यात आला आहे.
2. दिल्ली-एनसीआरमध्ये कोणता GRAP टप्पा लागू करण्यात आला आहे?
वायुगुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) GRAPचा तिसरा टप्पा लागू केला आहे.
3. GRAP-3 अंतर्गत कोणत्या कामांवर बंदी आहे?
अनावश्यक बांधकाम व पाडकाम, माती खोदणे, पायाभरणीसाठी पाइलिंग, खंदक खोदणे आणि रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्पांमधील काही कामांवर निर्बंध आहेत.






