नेहरू, अदानी, संविधान अन् मोदी; पहिल्याचं भाषणात प्रियांका गांधींची संसदेत तुफान फटकेबाजी
काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या नवनिर्वाचीत खासदार प्रियांका गांधी यांचं आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिलं भाषण झालं. आज लोकसभेत संविधानावर चर्चा होती. त्याचाच आधार घेत प्रियांका गांधी यांनी देशातील व्यवस्था आणि सरकारची उद्योगपदीविषयीची आस्था यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांचं संसदेतील हे पहिलंच भाषण चांगलंच गाजलं असून आज देशभर त्यांच्या भाषणाची चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस, उन्नाव आणि संभलसारख्या घटनांचा उल्लेख करत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सध्याच्या सरकारने संविधान कमकुवत करण्याचं काम केल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
‘आपल्या देशात सर्व धर्माची जुनी परंपरा आहे, हजारो वर्षांची ही जुनी परंपरा संवाद आणि चर्चेची आहे. वेद, उपनिषदांमध्ये एक गौरवशाली परंपरा आहे. इस्लाम, जैन आणि शीख धर्मात वादविवाद आणि चर्चेची संस्कृती आहे. या परंपरेतूनच आपला स्वातंत्र्यलढा उभा राहिला. सत्य आणि अहिंसेवर आधारित हा जगातील एक अनोखा लढा होता. आपला स्वातंत्र्यलढा लोकशाहीवादी होता आणि या लढ्यात प्रत्येक वर्ग, जाती, धर्माच्या लोकांनी भाग घेतला. त्या स्वातंत्र्यलढ्यातून एक आवाज उठला, तो आवाज आपल्या देशाचे संविधान आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
“संविधान हा केवळ दस्ताऐवज नाही. या संविधानाच्या निर्मितीमध्ये अनेक नेते वर्षानुवर्षे मग्न होते. या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाच्या धारणेने प्रत्येक नागरिकाला देशाच्या उभारणीत आपलाही वाटा असल्याचा विश्वास प्रदान केला. उन्नावमध्ये बलात्कार घडला होता. त्या पीडितेच्या घरी गेले. तिला जाळून मारण्यात आलं. त्या नराधमांविरोधात पीडितेने एकटीने लढा दिला. आपल्या संविधानाने ही लढण्याची क्षमता आणि हे धैर्य त्या पीडित आणि करोडो महिलांना दिले. हातरसलाही गेले तिथे अरुण वाल्मिकी हा पोलीस ठाण्यात सफाई कामगार म्हणून काम करायचा. त्याला चोरीच्या आरोपावरून मारहाण झाली आणि त्यातचं त्याला मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. आपल्या राज्यघटनेने त्यांना हा अधिकार दिला आहे,”
“संविधान हे एक संरक्षक कवच आहे, जे देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवते. न्याय, एकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही ढाल आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी गेल्या १० वर्षांत हे संरक्षण कवच तोडण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यघटनेत सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे वचन आहे, ते मोडण्याचे काम सुरू आहे. कदाचीत लोकसभेचे निकाल असे आले नसते तर राज्यघटना बदलण्याचे काम सुरू झालं असतं, असा घणाघात त्यांनी केला.
“सत्ताधारी आणि भाजपचे लोक भूतकाळाबद्दल अधिक बोलतात. भूतकाळात काय घडलं? पंडीत नेहरूंनी काय केलं?, पण वर्तमानाबद्दल बोला. देशाला सांगा तुम्ही काय केलं, काय करत आहात? तुमची जबाबदारी काय? संपूर्ण जबाबदारी जवाहरलाल नेहरूंची आहे का? असा सवाल करत, हे सरकार आर्थिक न्यायाचं संरक्षण कवच तोडत आहे. बड्या उद्योगपतींसाठी कृषीकायदे केले जात आहेत. वायनाडपासून ललितपूरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. हिमाचलमध्ये सफरचंद पिकवणारे लहान शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत कारण फक्त एका व्यक्तीसाठी सर्व काही बदललं जात आहे. अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.