चंदीगड : गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. पण आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी बुधवारी आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची दिल्लीतील तिहार तुरुंगात भेट घेतली. त्यानुसार, आता पंजाबमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भगवंत मान यांनी पंजाबमधील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आणि काही जागांवर पक्षाला चांगली कामगिरी करता आली आणि काही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले याची कारणे सांगितली. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पक्षाने संगरूर मतदारसंघातून मोठा विजय मिळवला असून, त्यामुळे होशियारपूरमध्येही पक्षाला यश मिळाले आहे. या निवडणुकीत संगरूरमधून मंत्री ग्रमीत सिंग मीत हैर विजयी झाले आहेत.
आता मीत हेयर यांना मंत्रिमंडळ आणि विधानसभेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातील एका मंत्र्याची जागा रिकामी होणार आहे. यापूर्वीही दोन कॅबिनेट मंत्र्यांची पदे रिक्त होती. भगवंत मान यांनी केजरीवाल यांच्यासोबत 3 मंत्री मंत्रिमंडळात घेण्यासाठी नावांवर चर्चा केल्याचे कळते.
तीन आमदारांना मंत्रिपद मिळणार
लोकसभा निवडणुकीत ज्यांची कामगिरी चांगली आहे आणि ज्यांच्या वर्तुळातून पक्षाने लोकसभा निवडणुकीत चांगली आघाडी घेतली आहे, अशा तीन आमदारांना मुख्यमंत्री मंत्रिमंडळात स्थान देणार आहेत. सरदूलगढ मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत सिंह बनावली यांना मंत्री केले जाऊ शकते.