राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी रायबरेली येथे पोहोचले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजप मंत्री दिनेश सिंह आणि त्यांच्या समर्थकांनी राहुल गांधींच्या ताफ्यासमोर जोरदार निदर्शने केली. मंत्री दिनेश सिंह यांनी राहुल गांधींविरोधात “गो बॅक” च्या घोषणा दिल्या. या विरोधावर राहुल गांधी यांनी आजच्या तिसऱ्या कार्यक्रमस्थळी, गोरा बाजार येथे, तीव्र प्रतिक्रिया दिली.
भाजपच्या विरोधावर पलटवार करताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसची वाढती लोकप्रियता पाहून भाजप अस्वस्थ झाली आहे. ते म्हणाले की, “संपूर्ण देशभरात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काँग्रेसचा विरोध करत आहेत, कारण त्यांना त्यांचा पक्ष रसातळाला जात असल्याचे दिसत आहे.”
The main naara these days is ‘Vote chor, gaddi chhor’, and it is being proven across the country. We will prove it again and again in more and more dramatic ways.
: LoP Shri @RahulGandhi
📍 Raebareli pic.twitter.com/2z0sXjl19K
— Congress (@INCIndia) September 10, 2025
राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशभरात ‘वोट चोर, गद्दी छोड़’ (मतचोर, खुर्ची सोडा) ही घोषणा खरी ठरत आहे आणि आम्ही हे पुन्हा पुन्हा सिद्ध करू. काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आपल्या या दौऱ्यादरम्यान अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आणि विकास प्रकल्पांचाही आढावा घेणार आहेत.
रायबरेलीमध्ये आरजेडी नेते तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर ‘भारताची अंतिम आशा, कलियुगाचे ब्रह्मा, विष्णू, महेश’ असे लिहिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या रायबरेली दौऱ्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातील लोकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. ते म्हणाले की, “आमचे नेते राहुल गांधी यांनी देशात झालेल्या मतचोरीचा पूर्णपणे पर्दाफाश केला आहे आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत आहे.”
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पंकज तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सर्वात आधी हरचंदपूर येथे पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर, ते गोरा बाजारमधील अशोक स्तंभाचे उद्घाटन करण्यापूर्वी शहराच्या एका हॉटेलमध्ये प्रजापती समाजाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते बूथ कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार असून, मनरेगा अंतर्गत बनवलेल्या एका पार्कची पाहणी करण्यासाठीही जाणार आहेत.