कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय शिबिराची आज सांगता झाली. दरम्यान या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी संघाचे ध्येय आणि संघाची पुढील वाटचाल याबद्दल माहिती दिली. यंदा संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला 6 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.
काय असणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 6 कलमी कार्यक्रम?
1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमीपासून होणार आहे. यानिमित संघ स्वयंसेवक आपल्या पूर्ण गणवेशात आपापले नगर, खंड आणि मांडले यामध्ये जाऊन अनेक कार्यक्रम आयोजित करणार आहेत. तसेच विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत.
2. नोव्हेंबर 2025 पासून पुढील तीन आठवडे घरोघरी मोठ्या स्तरावर मोहीम राबवली जाणार आहे. स्थानिक शाखांद्वारे विविध स्तरावर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
3. राष्ट्राच्या विकासात सर्वांचे योगदान, तसेच सर्व मंडळांमध्ये हिंदू संमेलने आयोजित केली जाणार आहेत.
4. सामाजिक सद्भाव बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. ज्यात सर्वांनी एकत्रित येऊन राहण्यावर भर दिला जाणार आहे.
5. जिल्हा स्तरावर नागरिक संवाद आयोजित केले जाणार आहेत, असे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले.
6. प्रत्येक प्रांतात युवकांसाठी विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
भाजपच्या मदतीसाठी RSS करणार मेगा प्लॅनिंग
बिहार आणि बंगालच्या विधानसभेची निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदत करण्याची शक्यता आहे. ज्यासाठी भाजप पक्ष आता आगामी निवडणुकांची तयारी करत आहे. सध्या कर्नाटकच्या बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबिर सुरू आहे, बंगळुरूमध्ये संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू आहे. तीन दिवसीय शिबिरात संघाने अनेक विषयांवर चर्चा केली.
बिहारच्या निवडणुका येत आहेत, अशा परिस्थितीत संघाची ही बैठक निवडणुकीच्या तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक मानली जात आहे. संघाच्या या बैठकीत एकूण 1,482 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बेंगळुरू येथे होणाऱ्या या तीन दिवसीय बैठकीत आरएसएसशी संबंधित ३२ संघटनांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस देखील सहभागी होतील, ज्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि सरचिटणीस बीएल संतोष यांचाही प्रमुख समावेश असेल. दिल्ली, महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मदत केल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला.
काय आहे आरएसएसचा प्लान 2B?
संघाच्या मिशन २बी चे पूर्ण रूप आम्ही तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थ बिहार आणि बंगाल असा होतो. बंगालमध्ये, गेल्या १० वर्षांत भाजप अधिक मजबूत झाला आहे आणि ३ वरून ७८ वर याची संख्या पोहोचली आहे. संघाला तिथेही आपला पाया मजबूत करायचा आहे. अशा परिस्थितीत, जर बंगालमध्ये तळागाळात संघ मजबूत झाला तर भाजपला त्याचा थेट फायदा मिळू शकतो.