राजस्थानच्या अजमेरजवळ रेल्वे अपघात; साबरमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली. एकाच रेल्वे रूळावरून दोन्ही रेल्वे आल्याने ही घटना घडली.

  अजमेर : राजस्थानमधील अजमेर येथे साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली. या भीषण घटनेनंतर साबरमती एक्सप्रेस ही रूळावरून खाली घसरली. एकाच रेल्वे रूळावरून दोन्ही रेल्वे आल्याने ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घसरलेल्या रेल्वेच्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

  रेल्वे अपघात इतका भीषण होता की, साबरमती आग्रा केंट सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनसह 4 डबे रुळावरून खाली घसरले. मदार स्टेशनजवळ रात्री 1.10 च्या सुमारास मालगाडी आणि एक्स्प्रेस एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला.

  चौकशीचे आदेश

  अपघाताच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे ट्रॅक व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे. एडीआरएम बलदेव राम यांनी सांगितले की, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

  राजधानी एक्स्प्रेसमध्ये धूर

  दिब्रुगडकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस गाडी हापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर ब्रेक जाम झाला. ब्रेक लावल्यामुळे ट्रेनच्या चाकांमधून धूर निघू लागला. रेल्वे स्थानकावर गाडीचा थांबा नव्हता, तरीही गाडी थांबल्याने अधिकाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ब्रेक बाइंडिंगची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंब घेऊन तत्काळ धाव घेत वाढत्या धुरावर नियंत्रण मिळवले. अभियंत्यांच्या टीमने अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर हा ब्रेक दुरुस्त करता आला.