
Samajwadi Party Akhilesh Yadav Target Modi Govt Over Women Reservation Bill
Women Reservation Bill : नवी दिल्ली : अखिलेश यादव यांनी महिला आरक्षण विधेयकावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत हे विधेयक मंजूर न झाल्याने, त्यांनी याला ‘ऐतिहासिक दिवस’ म्हटले आणि सरकारला आता सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असे सांगितले.
सपा प्रमुखांनी आरोप केला की, भारतीय जनता पक्षाला (भाजप) महिला आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्याची अंमलबजावणी करण्याऐवजी त्याचे केवळ राजकीय घोषवाक्य बनवायचे आहे. त्यांनी भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, पक्ष ‘निर्माण करा, दिशाभूल करा आणि भीती निर्माण करा’ (Create, Mislead, and Fear) या ‘सीएमएफ फॉर्म्युल्यावर’ काम करत आहे, म्हणजेच मुद्दे निर्माण करणे, लोकांची दिशाभूल करणे आणि भीतीचे वातावरण तयार करायचे असे मोदी सरकार करत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
पुढे अखिलेश यादव यांनी असेही म्हटले की, महिला आरक्षण विधेयक हे खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मते, हे विधेयक “भाजपच्या वाईट हेतूंचा काळा दस्तऐवज” होता, ज्याला विरोधी पक्षांनी एकजुटीने मंजूर होण्यापासून रोखले.
अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले की, समाजवादी पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, तर मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) सारख्या इतर तरतुदींसोबत ते ज्या पद्धतीने आणले गेले, त्याला पक्षाचा विरोध आहे. त्यांनी सांगितले की, महिला सन्मान आणि योग्य प्रतिनिधित्वास पात्र आहेत, परंतु यासाठी एक निष्पक्ष आणि पारदर्शक प्रक्रिया आवश्यक आहे.
जातिगणनेच्या मागणीचा पुनरुच्चार
त्यांनी जातिगणनेच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि म्हटले की, ही प्रक्रिया आधी पूर्ण झाली पाहिजे, जेणेकरून आरक्षणाचे खरे चित्र समोर येईल आणि समाजातील सर्व घटकांना न्याय मिळू शकेल. त्यांनी असा आरोप केला की, भाजप जाणीवपूर्वक जातिगणना टाळत आहे, कारण त्यामुळे आरक्षणाची मागणी अधिक मजबूत होईल.
अखिलेश यादव म्हणाले की, “समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी देशाला केवळ आरक्षणाचीच नव्हे, तर ‘संरक्षणाची’ देखील गरज आहे. त्यांचा विश्वास आहे की, जर हे विधेयक जनगणनेनंतर आणले असते, तर कदाचित सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला असता.” असे ते म्हणाले आहेत.
हे सुद्धा वाचा -राजीनाम्याचा लेटर बॉम्ब! साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ; मेळाव्याआधीच संघटनेत भगदाड
त्यांनी असाही आरोप केला की, सरकार या विधेयकाच्या माध्यमातून आणखी एक छुपा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. ते म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांनी एक ‘लक्ष्मणरेषा’ आखली आहे, जी भाजप ओलांडू शकला नाही, अशी घणघाती टीका सपा नेते अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर केली आहे.