दिल्ली : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. येत्या 1 जून देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी असे चित्र दिसले. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना लोकसभेच्या प्रचारासाठी सुप्रिम कोर्टाकडून अंतरिम जामीन देत प्रचाराची परवानगी दिली होती. इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा जामीन वाढवण्याची याचिकेच्या सुनावणीस नकार देण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना झटका दिला आहे.
याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्यात आला होता. 1 जूनपर्यंत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता. ही जामीनाची मूदतवाढ व्हावी अशा आशयाची याचिका केजरीवाल यांनी केली होती. मात्र सुप्रिम कोर्टाने केजरीवाल यांना झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना उन्हाळाच्या सुट्टीकालीन पीठाने जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा 2 जून रोजी तिहार तुरुंगामध्ये जावे लागणार आहे. ही बाब आप आणि इंडिया आघाडीसाठी चिंता वाढवणार आहे.
केजरीवाल 2 जूननंतर पुन्हा तिहार तुरुंगात
अरविंद केजरीवाल यांनी जामीन वाढवून देण्याची मागणी सुप्रिम कोर्टामध्ये केली होती. तब्येत ठीक नसल्याच्या कारणावरुन जामीन वाढवल्याची याचिका केली होती. या याचिकेसाठी सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती महेश्वरी यांनी सरन्यायाधीशांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. सरन्यायाधीश यावर सुनावणी घेतील, असे न्यायमूर्ती महेश्वरी यांनी सांगितले. मात्र सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना 2 जूननंतर पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.






