
जागतिक तापमानवाढीसंदर्भात अवघ्या मानवजातीला धोक्याची घंटा ठरणारा एक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार गेले 12 महिने हे पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेले सर्वात उष्ण 12 महिने होते. क्लायमेट रिसर्च या समाजसेवी विज्ञान संशोधन संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीसंदर्भात अवघ्या मानवजातीला धोक्याची घंटा ठरणारा एक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार गेले 12 महिने हे पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेले सर्वात उष्ण 12 महिने होते. क्लायमेट रिसर्च या समाजसेवी विज्ञान संशोधन संस्थेकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. यानुसार, नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 हा कालखंड पृथ्वीतलावर नोंद करण्यात आलेल्या तापमानातील सर्वात उष्ण तापमानाचा काळ होता.
कोळसा, नैसर्गिक वायू इतर इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचे तापमान वाढवणारे कार्बनडाय ऑक्साईडसारखे वायू बाहेर पडत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. या वर्षभरात पृथ्वीवरील जवळपास 7.3 बिलियन अर्थात 90 टक्के लोकसंख्येला किमान 10 दिवस अतिउष्ण दिवसांचा अनुभव आला. हे प्रमाण सामान्य तापमानापेक्षा तब्बल तीन पट अधिक असल्याचीही नोंद झाली. या काळात सरासरी जागतिक तापमान 1.3 अंश सेल्सिअस नोंद झाले.
पॅरिस करारानुसार जागतिक स्तरावर सगळ्यांनीच मान्य केलेल्या 1.5 अंश सेल्सिअस मर्यादेच्या हे अगदी जवळ पोहोचल्याचे दिसत आहे. क्लायमेट सेंट्रलचे वैज्ञानिक अँड्र्यू पशिंग म्हणाले की, मला वाटते यावर्षी समोर आलेल्या आकडेवारीतून एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे. ती म्हणजे कुणीच सुरक्षित नाही. प्रत्येकाला वर्षभरात कधी ना कधी असामान्य अशी उष्णता अनुभवायला मिळाली आहे.