गोवा भारतातील एक पर्यटन राज्य. या राज्याची संस्कृती, परंपरा आणि निसर्गसौदर्य हे देशी विदेशी पर्यटकांना नेहमीच साद घालत. येथील जीवनशैली, रात्रीचे जीवन हे लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. आज देशातील पर्यटन राज्य म्हणून गोव्याची एक विशेष ओळख आहे. मात्र या राज्याची भारतामध्ये सामिल होण्याचा इतिहास हा खूप वेगळा आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काही प्रदेश देशाच्या ताब्यात नव्हता. तेथे परकीयांचे राज्य होते. गोवा हे त्यातील एक राज्य होते ज्यावर तब्बल 450 वर्षे पोर्तुगीजांनी राज्य केले. स्वातंत्र्यानंतरही हे राज्य सुरु होते.
गोवा मुक्ती दिन
दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताचा हा स्वातंत्र्यलढा हा जगासाठी प्रेरणादायी होता मात्र त्यावेळी गोवा आणि काही प्रदेशांवर पोर्तुगीजांचे राज्य होते. तब्बल 14 वर्षानंतर गोव्याला स्वातंत्र्य मिळाले तो दिवस होता आजचा दिवस. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा भारतामध्ये सामील झाला. तेव्हापासून दरवर्षी 19 डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
राम मनोहर लोहियांनी ओळखला पोर्तुगीजांचा डाव
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. ब्रिटिशांनी ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या हालचाली सुरु केल्या त्यावेळी पोर्तुगीजही गोव्याला मुक्त करतील असे समजले जात होते. पोर्तुगीजांची पुढची चाल त्यावेळी थोर समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी ओळखली होती की त्यांना गोवा मुक्त करायचा नाही. त्यामुळे 18 जून 1946 रोजी लोहिया यांनी पहिल्यांदा पोर्तुगीजांना आव्हान दिले. त्यांच्या आव्हानाचे रुपांतरण नंतर तीव्र आंदोलनामध्ये झाले. त्यातूनच निर्माण झाला गोवा मुक्ती संग्राम. गोव्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी एक दीर्घकाळ लढा दिला.
डॉ. लोहियांनी स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्यिकांनाही लढ्यात जोडले
गोवा मुक्ती संग्रामात डॉ. लोहियांनी उभ्या केलेल्या या आंदोलनात केवळ स्थानिक लोकांनाच नव्हे तर देशभरातील स्वातंत्र्यसैनिका सहभागी करुन घेतलेच त्याचबरोबर कोकणी आणि मराठी भाषेतील अनेक साहित्यिकांना गोवा मुक्ती चळवळीशी जोडले. या साहित्यिकांमध्ये बाळकृष्ण भगवंत बोरकर, गजानन रायकर, मनोहरराव सरदेसाई, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर इत्यादी प्रमुख साहित्यिक होते त्यांनी आपल्या क्रांतिकारी लेखनाद्वारे गोमंतकांना स्वातंत्र्याच्या यागात सामील होण्याची प्रेरणा दिली.
अवघ्या 36 तासात पोर्तुगीजांची शरणागती
भारत सरकारनेही पोर्तुगीजांविरुद्ध कठोर भूमिका घेत “ऑपरेशन विजय” ची घोषणा केली आणि गोवा मुक्ती करिता 30 हजार सैनिकांची तुकडी पाठवली. त्यानंतर हवाई दल, नौदलाद्वारे हल्ला केला आणि पोर्तुगीजांनी अवघ्या 36 तासातच बिनशर्त सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर गोवा भारतामध्ये सामिल झाला गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. 30 मे 1987 रोजी भारताच्या पूर्ण राज्याचा दर्जा गोव्याला देण्यात आला. त्यामुळे 30 मे हा दिवस गोव्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.






