फोटो सौजन्य - Social Media
लिबरल आर्ट्सची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे विषय निवडीचे स्वातंत्र्य. पारंपरिक शिक्षणात एका शाखेतच अडकून राहावे लागते; मात्र लिबरल आर्ट्समध्ये तसे बंधन नसते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने मानसशास्त्र हा मुख्य विषय (मेजर) निवडला असेल, तर त्यासोबत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, कला, भाषा किंवा वर्तनशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास करता येतो. यामुळे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास सर्वांगीण होतो. ही संकल्पना काहीशी नवी वाटत असली, तरी भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धतीत धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, युद्धशास्त्र, प्रशासन आणि व्यापार अशा विविध शाखांचा समन्वय साधूनच शिक्षण दिले जात असे.
लिबरल आर्ट्स अभ्यासक्रम कोणासाठी योग्य आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. ज्यांना वाचन-लेखनाची आवड आहे, समाजातील घडामोडींवर विचारपूर्वक मत मांडण्याची सवय आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याची तयारी आहे आणि मानवी समाज, इतिहास, राजकारण, साहित्य व संस्कृती यांचा अभ्यास करण्याची उत्सुकता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी लिबरल आर्ट्स अतिशय उपयुक्त ठरतो. बारावी कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. काही महाविद्यालये बारावीच्या गुणांवर किंवा सीयुईटी (CUET) परीक्षेद्वारे प्रवेश देतात, तर काही नामांकित विद्यापीठे स्वतंत्र प्रवेश परीक्षा व मुलाखत घेतात. या प्रक्रियेत भाषिक कौशल्य, तार्किक विचार, सामान्यज्ञान, लेखन आणि विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाते.
लिबरल आर्ट्समध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेता येते. अभ्यासक्रमात मेजर, मायनर, इलेक्टिव्ह विषय, कौशल्याधारित शिक्षण, प्रकल्प, इंटर्नशिप आणि अनुभवाधारित अध्ययन यांचा समावेश असतो. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांतील विषय निवडण्याची मोकळीक मिळते. यामुळे विद्यार्थ्याला स्वतःच्या आवडी आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार शिक्षणाची दिशा ठरवता येते.
करिअरच्या दृष्टीने पाहता लिबरल आर्ट्सचे पर्यायही विस्तृत आहेत. पत्रकारिता, मीडिया रिपोर्टिंग, एडिटिंग, जनसंपर्क, जाहिरात, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मानव संसाधन व्यवस्थापन, संशोधन, समाजसेवा, शिक्षण, नागरी सेवा, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, आंतरराष्ट्रीय संबंध आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. डिजिटल साक्षरता, डेटा अॅनालिटिक्स आणि डिझाईन थिंकिंगसारखी आधुनिक कौशल्ये मिळाल्यामुळे देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावरही लिबरल आर्ट्स पदवीधारकांसाठी करिअरचे नवे दरवाजे खुले होत आहेत.






