
West Bengal, Political Violence, Suvendu Adhikari, BJP, TMC, Howrah
मिळालेल्या माहितीनुसार, शिवपूरच्या चौराबस्ती परिसरात भाजप कार्यकर्ते स्थानिक नागरिकांशी संवाद साधत असताना दुचाकींवरून आलेल्या काही समाजकंटकांनी त्यांच्यावर सलग बॉम्बफेक केली. या घटनेनंतर परिसरात विटाफेक, गोंधळ आणि दुकानांची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे नेते मनोज खान यांच्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन फैरी झाडण्यात आल्याचे तसेच सात कच्चे बॉम्ब फुटल्याची माहिती आहे.
अखिलेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, “शिवपूरच्या चौराबस्ती परिसरात राजकीय संघर्ष झाला असून त्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.” या घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली असून संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे.
भाजपने या हिंसाचारासाठी थेट तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, बसीरहाट येथेही निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची घटना समोर आली आहे. भाजप कार्यकर्ता रोहित राय यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना पोटात गोळी लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या मीडिया सेलने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित राय यांनी दावा केला की, ते परिसरात भाजपचे झेंडे लावत असताना तृणमूल समर्थक समाजकंटकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
याचदरम्यान, बारानगर परिसरात आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.