२०३० पर्यंत रेल्वेचे जाळे ९०१ किमीने विस्तारणार; २३,४३७ कोटींच्या ३ रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
Indian Railway Projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींवरील मंत्रिमंडळ समितीने सुमारे २३,४३७ कोटी रुपयांच्या रेल्वे मंत्रालयाच्या तीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे केवळ देशाची पायाभूत सुविधाच बळकट होणार नाही, तर आर्थिक विकासाचा वेगही वाढणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील १९ जिल्ह्यांना या रेल्वे प्रकल्पाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे संपर्क यंत्रणा अधिक सक्षम होऊन देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणेही अधिक सुलभ होईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर दिली आहे.
आता याला काय म्हणावं? उद्घाटनापूर्वीच पुलाचा पिलरच कोसळला; पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या या तीन प्रमुख ‘मल्टी-ट्रॅकिंग’ प्रकल्पांचा एकूण अंदाजित खर्च सुमारे २३,४३७ कोटी रुपये असून ते वर्ष २०३०-३१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनांतर्गत, भारतीय रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार सुमारे ९०१ किलोमीटरने होणार आहे.
रेल्वेचे हे प्रकल्प मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील १९ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले असतील. परिणामी, ४,००० हून अधिक गावांमधील सुमारे सुमारे ८३ लाख नागरिकांना या सुधारित संपर्क व्यवस्थेचा लाभमिळेल. या योजना ‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय महायोजने’ अंतर्गत तयार करण्यात आल्या आहेत; या योजनेचा उद्देश बहु-माध्यमी संपर्क व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा बळकट करणे हा आहे. या उपक्रमामुळे लोकांची, वस्तूंची आणि सेवांची वाहतूक अधिक अखंड आणि सुलभ होईल.
या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नागदा-मथुरा (तिसरी आणि चौथी मार्गिका), गुंतकल-वाडी (तिसरी आणि चौथी मार्गिका) आणि बुरहवाल सीतापूर (तिसरी आणि चौथी मार्गिका) यांचा समावेश आहे. या अतिरिक्त मार्गिकांमुळे रेल्वेची वाहतूक अधिक सुरळीत होईल, गाड्यांना होणारा विलंब कमी होईल आणि रेल्वे सेवा अधिक विश्वासार्ह बनतील, असा दावा रेल्वेने केला आहे.






