WFI Election : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांनी माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल समोर आला असून संजय कुमार सिंह यांनी ही निवडणूक जिंकली आहे. संजय सिंह हे भाजपाचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी आज (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला आहे. एकूण ४७ जणांनी या निवडणुकीत मतदान केलं. यापैकी ४० मतं संजय सिंह यांच्या पारड्यात पडली तर अनिता यांना केवळ सात मतं मिळाली आहेत. दरम्यान, देवेंद्र कार्तियान यांची कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्षपदी आणि प्रेमचंद लोजब यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण
संजय सिंह याआधी कुस्ती महासंघाचे सदस्य होते. तसेच २०१९ मध्ये राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे संयुक्त सचिवदेखील होते. तर माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांना लोकप्रिय कुस्तीपटू बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज कुस्तीपटूंचं समर्थन मिळालं होतं. या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते.
विरोधकांचे दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन
देशातल्या अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानात आंदोलनही केलं होतं. या आंदोलनानंतरही बृजभूषण यांच्याविरोधात कोणतीही मोठी कारवाई झाली नाही. दरम्यान, कुस्तीपटूंनी बृजभूषण यांना तसेच त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्यांना कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत उतरवू नये अशी मागणी केली होती. त्यामुळे संजय सिंह यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. ते आता कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष असतील.
बृजभूषण सिंह हे त्यांचा मुलगा प्रतीक आणि जावई विशाल सिंह यांना कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत होते. परंतु, कुस्तीपटूंच्या विरोधानंतर त्यांना हा निर्णय घेता आला नाही. त्यामुळे संजय सिंह यांनी ही निवडणूक लढवली. संजय सिंह हे बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर बृजभूषण सिंह यांचे जावई विशाल सिंह म्हणाले, “आमचं पॅनल जिंकलं आहे. आमचे सर्वच उमेदवार मोठ्या बहुमताने जिंकले आहेत.”
Web Title: Wfi election brijbhushan singh is incharge of wrestling federation sanjay singh wins anita sharon loses nryb