नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या १६व्या दिवशी भारताने निर्णायक पाऊल उचलत ‘operation sindoor’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अमेरिका, रशिया, ब्रिटनसह प्रमुख आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना बुधवारी मध्यरात्री देण्यात आली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेलगतच्या १०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त केले. या मोहिमेपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी सखोल माहिती संकलित केली होती, त्या आधारे अचूक लक्ष्य निवडण्यात आले.
भारतीय सशस्त्र दलांनी जैश-ए-मोहम्मदचे ४, लष्कर-ए-तैयबाचे ३ आणि हिजबुल मुजाहिदीनचे २ अड्डे उद्ध्वस्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या छावण्या भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होत्या, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांच्या डझनभर अड्ड्यांचा मागोवा घेण्यात आला होता. त्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले गेले आणि अचूक वेळ आणि ठिकाण निश्चित करून हल्ला करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. कुठल्याही हालचालीसाठी शत्रूपक्षाला वेळ मिळू नये यासाठी हे सर्व हल्ले सिंक्रोनाइझ्ड ऑपरेशनच्या स्वरूपात केले गेल्याचे सांगितले जात आहे.
“Operation Sindoor ” नंतर पाकिस्तान चवताळला; LoCवर बेधुंद फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू
या कारवाईनंतर भारताने जागतिक समुदायाला पारदर्शक माहिती देण्याचा निर्णय घेतला. विशेषत: अमेरिका, रशिया आणि ब्रिटन यांना या कारवाईबाबत माहिती देऊन, भारताच्या भूमिकेला जागतिक पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ अंतर्गत करण्यात आलेल्या लक्ष्यित हवाई हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे. यासह लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांनाही जमिनदोस्त करण्यात आले आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले, ज्यामुळे दहशतवाद्यांच्या मोठ्या हालचालींना जबरदस्त धक्का बसला आहे.
या कारवाईत सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये झाला, जे जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख तळ मानले जाते. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे १०० किमी आत असून, आता ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले असल्याचे सैनिकी सूत्रांनी सांगितले.
सांबा सेक्टरपासून अवघ्या ३० किमीवर असलेल्या मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या तळावर दुसरा मोठा हल्ला करण्यात आला. २००८ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याच ठिकाणहून तयार झाले होते, असे सांगितले जाते.
Operation Sindoor: भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी हाफिज
तिसरा हल्ला गुलपूर येथे झाला, जे नियंत्रण रेषेपासून सुमारे ३५ किमी अंतरावर आहे. याच भागातून २० एप्रिल २०२३ चा पूंछ हल्ला आणि जून २०२४ मधील बसवरील हल्ला घडवून आणला गेला होता.
पीओकेमधील तंगधार सेक्टरपासून ३० किमीवर असलेला लष्करचा ‘सवाई कॅम्प’ही हल्ल्याचे लक्ष्य ठरला. या ठिकाणावरूनच सोनमर्ग (२० ऑक्टोबर २०२४), गुलमर्ग (२४ ऑक्टोबर २०२४) आणि पहलगाम (२२ एप्रिल २०२५) हल्ले रचले गेले होते.
पाचवे लक्ष्य ‘बिलाल कॅम्प’ होते, जे जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख लाँचपॅड मानले जात होते. सहावे लक्ष्य ‘लष्कर कोटली कॅम्प’, हे राजौरीच्या नियंत्रण रेषेच्या आत १५ किमी अंतरावर होते. येथे ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते.
देशातील 244 ठिकाणी आज ‘मॉक ड्रिल’; जाणून घ्या नेमकं काय-काय
सातवे स्थान बर्नाला कॅम्प होते, जे नियंत्रण रेषेच्या १० किमी आत असून हिजबुलच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. आठवे लक्ष्य ‘सरजल कॅम्प’, हे जैशचे दुसरे तळ मानले जात होते. ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ ८ किमी अंतरावर होते.
नववे आणि अंतिम लक्ष्य महमूना कॅम्प होते, जे सियालकोटजवळ आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किमी आत स्थित होते. हे हिजबुल मुजाहिदीनचे मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याची माहिती आहे.