देवगड कुणकेश्वर मंदिरासमोरील समुद्रामध्ये आज (सोमवार, दि. 28 ऑक्टोबर 2024 ) दुपारी 2 वा सुमारास सर्वांना हादरवणारी घटना घडली आहे. रत्नागिरी, जयगड येथील पर्ससीन बोटीवरील खलाशांमध्ये झालेल्या वादामध्ये एका खलाशाने तांडेलचे डोकं कापून धडावेगळे केले. कापलेलं मुंडकं बोटीवरच ठेवून तिथेच आरोपी बसून राहिला. त्या आरोपीने बोटीवरील आणखी काही खलाशांवरही हल्ला केला. या घटनेने घाबरलेल्या खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या. तर आरोपी खलाशाने रागाने बोट पेटवून दिली. या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.
देवगड येथील समुद्रात रत्नागिरी व आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर बोटी मच्छीमारीसाठी आलेल्या होत्या.त्यातील राजीवडा येथील रफिक फणसोपकर यांची बोट ही मच्छीमारीसाठी देवगड समुद्रात आलेली होती.त्यावेळी त्या बोटीवरील खलाशांमध्ये वाद झाला त्यामध्ये आरोपी खलाशाने चक्क तांडेल याचे डोकं कापलं आणि ते त्याचं डोकं बोटीवर ठेवलं. खलाशी त्या कापलेल्या मुंडक्यासोबत तिथेच बसून राहिला. बोटीवरील आणखी काही खलाशांवरही त्याने हल्ला केला. या घटनेने बोटीवरील घाबरलेल्या खलाशांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या. त्यादरम्यानच आरोपी खलाशाने संपूर्ण बोटीला आग लावून दिली. त्या बोटीच्या आगीचे प्रचंड लोट तेथील समुद्रात पसरलेले दिसत आहे.दरम्यान आजूबाजूला रत्नागिरीतील काही मच्छीमार बोटी होत्या त्यांनी बोटीवरच्या इतर जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी खलाशाची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचे समजते. त्याने चक्क आपल्या बोटीवरच्या तांडेलला मारून त्याचे डोके बोटीवर ठेवले आणि स्वतः बोटी ला आग लावून पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.त्या बोटीवर 35 ते 40 जण असण्याची शक्यता असून त्या सगळ्यांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु तो खलाशी हा जळलेल्या बोटीवर बसून होता शेवटी त्यांनी पाण्यात उडी मारली आणि पाण्यातच राहिला . पोलिसांच्या बोटी घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.तसेच खलाशांना किनारी आणण्यात येत होते.
राज्यात कोकणात या काळात मोठ्याप्रमाणात मासेमारीसाठी स्थानिक कोळी आणि तांडेलांच्या बोटी समुद्रामध्ये जातात. या बोटींसोबत अनेक खलाशी असतात. अनेकदा या बोटी काही दिवसांकरिता समुद्रामध्ये असतात. योग्य प्रमाणात मासेमारी झाली की या बोटी समुद्रकिनाऱ्यावर येतात. अनेकदा या या बोटी समुद्रातील एकाच ठिकाणी अथवा एकमेकांच्या जवळच मासेमारी करतात. बोटीवर वाद झाल्यास खलाश्यांना नियंत्रित करणे शक्य होत नाही. त्यामुळे खलाशांमध्ये योग्य ताळमेळ असणेही आवश्यक असतो. मात्र मानसिक प्रकृती योग्य नसलेला खलाशी समुद्रात बोटीवरुन नेलाच का हा प्रश्नही या घटनेने समोर येत आहे. पोलिस या घटनेचा तपास घेत आहेत