वडूज : सद्यस्थितीत सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) एकूण 21 संचालकांपैकी 11 संचालक बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित 10 संचालक निवडणूक रिंगणात उभे आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या आमिष अथवा दबावाला मतदारांनी बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन राज्याचे सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वडूज येथील प्रचार मेळाव्यात केले.
वडूज ता. खटाव येथील आयोजित सहकार पॅनल प्रचार मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, खटाव माण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी सभापती संदीप मांडवे, माजी संचालक प्रा. अर्जुनराव खाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, प्रकृतीच्या कारणांमुळे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची अनुपस्थिती होती.
बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेत ५ वर्षे चांगले काम केल्यामुळेच सहकार पॅनेलच्या विरोधात दुसरे सक्षम पॅनेल उभे राहू शकले नसल्याचंही यावेळी सांगितले. तर जिल्हा बँकेत ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी मिळाली नसली तरी नाराज न राहता राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनेलचा जोमाने प्रचार करणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे यांनी सांगितले.
उमेदवार नंदकुमार मोरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादी पक्षाने दोन वेळा जिल्हा बँकेवर संधी तर विधान परिषदेची आमदारकी एवढे सगळे देवून सुध्दा त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचा खोटा कांगावा केल्याचं मत व्यक्त केले. तर प्रभाकर देशमुखांनी बँकेचे काम योग्य पद्धतीने होत असून या कामकाज पद्धतीमध्ये बेरोजगार युवक व गट शेतीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य मिळण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबविण्यात यावा असं आवाहन केले. कार्यक्रमास तालुक्यातील गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रमुख कार्यकर्ते व जिल्हा बँक उमेदवारासह अनेक मान्यवर उपस्थित होते.