नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेनंतर त्यांनी सोशल मीडियावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, हा हल्ला केवळ त्यांच्यावर नसून दिल्लीतील जनतेच्या सेवेवर आणि हितावर केलेला “भ्याड हल्ला” असल्याचे म्हटले आहे.
आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये रेखा गुप्ता यांनी म्हटले आहे की, “आज सकाळी जनसुनावणीदरम्यान माझ्यावर झालेला हल्ला हा फक्त माझ्यावर नाही, तर दिल्लीची सेवा करण्याच्या आणि जनतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या आमच्या संकल्पावर केलेला एक भ्याड प्रयत्न आहे. या हल्ल्यानंतर मी नक्कीच हादरले होते, पण आता मी बरे वाटत आहे. माझ्या सर्व हितचिंतकांना माझी विनंती आहे की, कृपया मला भेटण्यासाठी गर्दी करू नका. मी लवकरच तुमच्यामध्ये काम करताना दिसेन.”
आज सुबह जनसुनवाई के दौरान मेरे ऊपर हुआ हमला केवल मेरे ऊपर नहीं, बल्कि दिल्ली की सेवा और जनता की भलाई के हमारे संकल्प पर किया गया एक कायराना प्रयास है।
स्वाभाविक है कि इस हमले के बाद मैं सदमे में थी, परन्तु अब बेहतर महसूस कर रही हूँ। मैं अपने सभी शुभचिंतकों से निवेदन करती हूँ कि…
— Rekha Gupta (@gupta_rekha) August 20, 2025
मुख्यमंत्री पुढे म्हणाल्या, “अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे माझे धैर्य आणि जनतेची सेवा करण्याचा माझा निर्धार कधीच तुटणार नाही. आता मी पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जा आणि समर्पणाने तुमच्यात राहीन. जनसुनावणी आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण पूर्वीप्रमाणेच गांभीर्याने आणि कटिबद्धतेने सुरू राहील. तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्या असीम प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी मनापासून आभार व्यक्त करते.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला सकाळी ८:१५ च्या सुमारास झाला. हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख राजेशभाई खिमजीभाई साकरिया (वय ४१) अशी झाली असून, तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे. तो तक्रारदार म्हणून मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचला होता. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “आम्ही सगळे बसलो होतो. ज्या व्यक्तीची पाळी आली, तो मुख्यमंत्र्यांसोबत बसला होता. तो त्यांच्याशी बोलत असताना अचानक त्याने त्यांच्यावर हल्ला केला. आम्हाला मोठा आवाज ऐकू आला आणि पोलिसांनी त्वरित त्या व्यक्तीला ताब्यात घेतले.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने मुख्यमंत्र्यांना पकडून ओढले आणि त्यांना जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात रेखा गुप्ता यांच्या हाताला, खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. पीडब्ल्यूडी मंत्री प्रवेश वर्मा यांनी सांगितले की, डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची तपासणी केली असून, त्यांची वैद्यकीय-कायदेशीर केस (MLC) तपासणीही करण्यात आली आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.