सुप्रीम कोर्टाकडून योगी आदित्यनाथ सरकारला दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या लॉकडाउनच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद या शहरांमध्ये आठवडाभराचा सक्तीला लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. लॉकडाउनला विरोध असणाऱ्या योगी सरकारने याविरोधीत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान सुनावणीच्या वेळी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की, “उच्च न्यायालयाने दिलेल्या काही सूचना गरजेच्या आहेत, मात्र पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावणं योग्य भूमिका नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही सूचना दिल्या आहेत आणि पूर्वकाळजी घेतली जात आहे. पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावल्याने प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात”.






