संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या कारणावरुन टोकाचे पाऊल उचलत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माहेरहून पैसे आणण्याचा तगादा तसेच सतत टोचून बोलणे ऐकून आणि शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नबिला शहबाज खान (वय २२, रा. उंड्री) अशी आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती शहबाज जफर खान (वय २५, रा. गगन त्रिशा सोसायटी, उंड्री) याला अटक केली आहे. याबाबत नबिला यांच्या भावाने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नबिला यांचा शहबाज याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मात्र, नबिला यांचा पती तसेच सासू सासऱ्यांनी संगणमत करून घरघुती कारणावरून शारिरीक व मानसिक छळ केला. वेळोवेळी त्यांच्या व्यावसायासाठी तसेच दैनंदिन वापराकरिता माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून त्यांचा छळ केला. या छळाला कंटाळून नबिला यांनी १३ एप्रिल रोजी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करत पतीला तत्काळ अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
आणखी एका विवाहित महिलेची आत्महत्या
गेल्या काही दिवसाखाली आणखी एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पती आणि सासू-सासरे व इतरांकडून सतत होणाऱ्या शिवीगाळ तसेच मारहाण व जाचाला कंटाळून ३३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी परिसरात घडली आहे. सुवर्णा सर्जेराव जाधव (वय ३३, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती सर्जेराव जाधव, सासरे माणिक भाऊ जाधव (वय ७०), सासू जयश्री माणिक जाधव (वय ६५), लक्ष्मी रामचंद्र कांबळे (वय ४०), पुष्पा दयानंद लोंढे (वय ३५), रोहन दयानंद लोंढे (वय २२), अनुराधा माणिक जाधव (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.






