मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) गेले काही दिवस त्यांच्या एका चित्रपटामुळे फारच चर्चेत आहेत. ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) हा त्यांचा चित्रपट सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटावर आक्षेप घेणायत आले होते. तर आता एका विशेष न्यायालयाने चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या विरोधात त्यांच्या या चित्रपटात लहान मुलांचे आक्षेपार्ह चित्रण केल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
विशेष POCSO न्यायालयाने स्थानिक माहिम पोलिसांना “नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा” या चित्रपटाच्या निर्मात्यांचे, दिग्दर्शक महेश मांजरेकरांसह चौकशी करण्याचे निर्देश दिले. सामाजिक कार्यकर्त्या सीमा देशपांडे यांनी त्यांचे वकील प्रकाश साळसिंगीकर यांच्यामार्फत मांजरेकर आणि इतरांवर कारवाईची मागणी करणारी तक्रार न्यायालयात केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, चित्रपटगृहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये “अश्लील साहित्य” भरपूर आहे.
तक्रारीतील योग्यता शोधून, विशेष न्यायाधीश एस एन शेख यांनी उपनगरी माहीम पोलिसांना सीआरपीसीच्या तरतुदींनुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. दिवंगत जयंत पवार यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, छाया कदम, शशांक शेंडे आणि कश्मीरा शाह हे कलाकार आहेत.
ही कथा दोन किशोरवयीन मुलांभोवती फिरते जे समाजाच्या वंचिततेचा आणि क्रूरतेचा सामना करत मोठे होतात आणि कट्टर गुन्हेगार बनतात.