IND vs UAE (Photo Credit- X)
IND vs UAE, Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात झाली आहे. मंगळवारी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने यूएईचा ९ विकेट राखुन पराभव केला. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला यूएईचा संपूर्ण संघ ५७ धावांवर गारद झाला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ९ विकेट राखुन विजयाचा नारळ फोडला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या यूएईच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या ५० धावांवरच त्यांचे अर्धे फलंदाज माघारी परतले. अखेर १३.१ षटकांत संपूर्ण संघ अवघ्या ५७ धावांवर गारद झाला. यूएईकडून सलामीवीर अलिशन शराफूने सर्वाधिक २२ धावांची खेळी केली.
A dominating show with the bat! 💪
A 9⃣-wicket win for #TeamIndia after chasing down the target in 4.3 overs. 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Bmq1j2LGnG#AsiaCup2025 | #INDvUAE pic.twitter.com/ruZJ4mvOIV
— BCCI (@BCCI) September 10, 2025
भारतीय गोलंदाजांनी यूएईच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने पहिला मोठा बळी मिळवला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ गडी बाद केले, तर शिवम दुबेने ३ विकेट्स घेतल्या. यूएईला ५७ धावांवर रोखल्यानंतर भारताला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकांत केवळ ५८ धावा करायच्या होत्या.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने धमाकेदार सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांनी अवघ्या २३ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने केवळ ४.३ षटकांत एक गडी गमावून ५८ धावांचे लक्ष्य पार केले. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने ३० धावांची धुवांधार खेळी केली, ज्यात त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर शुभमन गिल २० धावांवर नाबाद राहिला. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने एकमेव विकेट घेतली. आशिया कपमधील आपला दुसरा सामना भारतीय संघ आता १४ सप्टेंबर, रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा रोमांचक सामना रात्री ८ वाजता दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.