मुंबई : कोणत्याही बदलाविना ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा प्रदर्शित करण्यास संजय लीला भंसाळींना (Sanjay Leela Bhansali) हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.
कॉंग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच कामाठीपुरातील स्थानिक रहिवाश्यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या चित्रपटातील दक्षिण मुंबईतील `कामाठीपुरा’ या परिसराचा संदर्भ काढून टाकण्याची मागणी करत या परिसरातील ५५ स्थानिक रहिवाश्यांच्यावतीने श्रद्धा सुर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील दृश्यांवरून कामाठीपुरा परिसराची प्रतिष्ठा मलिन होत आहे. चित्रपटाने संपूर्ण परिसर रेड-लाइट हब म्हणून चित्रित करून त्या परिसराला अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. येथील रहिवाशांची, विशेषतः महिलांची प्रतिमा मलीन होण्याची भीती आहे, त्यामुळे यातील कामाठिपुरा हा शब्द वगळावा आणि अन्य, तत्सम शब्द वापरावा, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.