मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व सृजनशीलतेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तू सर्वसामान्यांकरीता उपलब्ध होण्यासाठी नाशिक मध्यवर्ती करागृहाअंतर्गत प्रगती विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंना सणोत्सवांच्या निमित्ताने व्यासपीठ मिळाले आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, 1927 साली या कारागृहाची निर्मीती झाली असल्याने अनेक नामवंत स्वातंत्र्य योद्धे तसेच साने गुरूजी हे या कारागृहात वास्तव्यास असल्याने या कारागृहास ऐतिहासिक ओळख आहे. कोणतीही व्यक्तिही जन्मत: गुन्हेगार नसते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे अथवा परिस्थितीमुळे बंदिवान व्हावे लागते. अशा परिस्थितीत बंदिवानांना सुधारण्यासाठी संधी मिळावी या हेतूने शासन व कारागृह प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असतो.
याच अनुषंगाने बंदिवानांच्या कलागुणंना वाव मिळावा यासाठी कारागृहात विणकाम, सुतारकाम, लोहारकाम, चर्मकाम, धोबीकाम, मुर्ती बनविणे व बेकरी उत्पादने अशी विविध कामे करण्यात येतात. यातून तयार करण्यात आलेल्या वस्तू, पदार्थ हे सणोत्सवांच्या काळात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. बंदिवानांनी बनविलेल्या या उत्पादनांची जाहिरात होणे गरजेचे आहे. ज्यामुळे बंदिवानांचे सुधारणा व पुनर्वसन होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कारागृहातील सोयी सुविधांसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.
कोरोनाच्या काळात कारागृहातील बंद्यांची विशेष काळजी घेण्यात आली असल्याने या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. त्यासाठी कारागृह प्रशासनाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. भुजबळ म्हणाले की, कारागृहात सिनेमाचे कलाकार असतात तसे इतरही कलाकार असतात. संजय दत्त यांनी देखील कारागृहात टोप्या बनवल्याच मला आठवतंय. कैदी कसे जनावरां सारखे राहतात हे मी पाहिलं आहे. प्रचंड गर्दी असते. पण, तरी देखील कोरोना आत घुसला नाही हे महत्वाचे.
दिवाळी मेळाव्या निमित्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फित कापून व दिप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी प्रदर्शनाची पाहणी करून बंदीवनांनी तयार केलेली चादर खरेदी केली.






